गयाबाई बळीराम बोराडे यांच्या दोन्ही डोळ्यातील वाहणाऱ्या अश्रूंना दुःख आणि समाधानाची किनार होती. दुःखाश्रू होते पुत्र वियोगाचे, तर समाधाचे अश्रू होते. आपल्या नातीचे लग्न दिवंगत मुलाच्या इच्छेप्रमाणे झाल्याचे तीच्या चेहऱ्यावर समाधान होते. पितृछत्र हरवलेल्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी मित्र आणि परिसरातील नागरिकांनी जणूकाही घरातीलच कार्य आहे इतक्या मनोभावे पार पाडल्याने हा विवाह पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाला होता. लोकसहभागातून झालेल्या लग्नाबाबतची चर्चा दोन दिवसांपासून आनंदाने होऊ लागली आहे. मुलाकडील मंडळींनी एक छदामही हुंडा घेतला नाही, हे या लग्नाचे आणखी एक वैशिष्टय़े ठरले.

परळी वैजनाथ येथील सावता माळी मंदिर परिसरात पार पडलेल्या एका विवाहाची ही गोष्ट आहे. उद्धव बोराडे या चाळीशीतील तरुणाचे तीन महिन्यांपूर्वी अकाली निधन झाले. उद्धव घरातील एकटाच कर्ता पुरुष. वडील लहानपणीच निधन पावलेले. आई गयाबाईंनी त्याला लग्न-कार्यात पोळ्या लाटून मिळणाऱ्या कमाईतून लहानचा मोठा केला. बबनभाई गित्ते यांच्या दुकानातील मालाची ने-आण करणारा रिक्षा चालवून पोट भरणारा उद्धव वृद्ध आई गयाबाईंसह पत्नी आणि तीन मुलींचा आधार होता.

अचानक कसल्यातरी आजारात तो अकाली गेला. मुलीचे लग्न साजेसे करायचे आहे, अशी इच्छा त्याने त्याचे मित्र चंद्रकांत शिंदे, अर्जून कराळे, विलास कराळे, गोविंद पोळ, सचिन आरसुडे, लक्ष्मण अनंतपुरे, जालिंदर नाईकवाडे आदींजवळ बोलून दाखवली होती. मात्र, तत्पूर्वीच उद्धव जगातून निघून गेला. आता उद्धवच्या मुलीचे लग्न कसे करायचे, असा प्रश्न गयाबाईंसमोर उभा राहिला. जमीन नाही की, विक्री करून चार पैसे जमवून लग्न करावे, असे काहीही नाही. प्रश्न मोठा घोर लावणारा होता. अखेर मित्रांनीच उद्धवच्या मुलीच्या लग्नाच्या इच्छेची आठवण झाली आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले.

परळीजवळील नैकोटवाडीच्या मंगश शिंदे याचे स्थळ आले. त्याने हुंडा म्हणून एक छदामही न घेता सारिकाशी लग्नाची तयारी दर्शवली. ठरल्याप्रमाणे विवाहाची तयारी सुरू झाली. चंद्रकांत शिंदे यांनी उद्धव काम करीत असलेले त्याचे मालक बबनराव गित्ते यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी खुल्या मनाने मदतीचा हात पुढे केला. सावता माळी मंदिर व्यवस्थापनाने सभागृहाच्या मूळ भाडय़ातील बरीच रक्कम कमी करून ते उपलब्ध करून दिले. आचारी, किराणा दुकानदारापासून लग्नासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू, कार्याचा भार उचलण्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे आले. अखेर उद्धवच्या मुलीचे लग्न त्याने केलेल्या कल्पनेपेक्षाही चांगल्या पद्धतीने पार पडले.

सारिकाला सासरी पाठवण्याची वेळ आली आणि तिने या लग्नासाठी पुढाकार घेतलेले चंद्रकांत शिंदे यांचे दर्शन घेतले आणि शिंदेंसह उद्धव यांच्या सर्व मित्र गहिवरले. मला मुलगी नाही, पण मुलीची सासरी पाठवणी करताना पित्याची काय मनोवस्था होत असते, याचा अनुभव सारिकाच्या लग्नामुळे आपल्याला आला, दाता होण्यातील समाधानही काय असते, याची अनुभूती आली अशी प्रतिक्रिया चंद्रकांत शिंदे यांनी दिली.