दुष्काळामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला असतानाच जिल्ह्य़ाच्या पठण व गंगापूर तालुक्यांतील शेतीचे पाणी बंद करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ औरंगाबाद शहराजवळील ब्रह्मगव्हाण येथून उद्योगांना होणारा पाणीपुरवठा सोमवारी शेतकऱ्यांनी अडवून धरला. परिणामी २ हजार उद्योग व या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या एक हजार निवासी भागास सोमवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. उशिरापर्यंत आंदोलनकत्रे शेतकरी आंदोलनस्थळी बसून होते. पाणी मिळणार नाही, तोपर्यंत येथेच मुक्काम करू, असे संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले.
जायकवाडी जलाशयातील पाणी केवळ पिण्यासाठी राखून ठेवावे, असा न्यायालयाचा आदेश असल्याने पठण व गंगापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना पाणी उचलता येत नाही. या भागातील वीज जोडण्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. पाणी दिसत असून घेता येत नाही. पिण्यासाठीच पाणी ठेवा, असे आदेश असतील तर उद्योगांना पाणी का सुरू ठेवले जात आहे, असा सवाल करीत सकाळी संतप्त शेतकरी ब्रह्मगव्हाण येथील औद्योगिक पाणीपुरवठा विभागात पोहोचले. त्यांनी तेथील पाणीपुरवठा बंद केला. या जलवाहिनीवरील २ हजार उद्योगांना याचा फटका बसला.
एमआयडीसीतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी पाणीपुरवठा दिवसभर होऊ शकला नसल्याचे सांगितले. ज्या उद्योगांकडे काही पाणी राखून ठेवण्यात आले होते, त्या कंपनीचे उत्पादन कसेबसे सुरू राहिले. अन्य उद्योगांना याचा फटका बसला. या अनुषंगाने अन्नदाता शेतकरी संघटनेचे सूर्यवंशी म्हणाले की, पिण्याचे पाणी, शेती व उद्योग असा प्राधान्यक्रम राज्य सरकारने मान्य केला आहे. मग शेतीसाठीचे पाणी बंद ठेवायचे व उद्योगांना ते चालू ठेवायचे ही नीती चुकीची आहे. त्याचा विरोध करण्यास हे आंदोलन करण्यात आले. गंगापूर व पठण तालुक्यांतील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही तोपर्यंत येथेच मुक्काम करणार आहोत.
ब्रह्मगव्हाण योजनेतून दररोज ५६ दशलक्ष लिटर पाणी उपसा उद्योगांसाठी केला जातो. या आंदोलनामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची समजूत घालता येईल का, याची चाचपणी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे करीत होते. या अनुषंगाने औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच मार्ग काढू, असे ते म्हणाले.

Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
sangli crime news, cloroform for md drugs marathi news
सांगली: तासगाव तालुक्यातील शेतात ११ लाखांचे द्रवरुप क्लोरोफार्म जप्त, एमडीसाठीचा कच्च्या मालाचा साठा