12 November 2019

News Flash

प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू; डॉक्टरांवर आरोप

ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेसह तिच्या पुरुष अर्भकाचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला.

प्रतिनिधिक छायाचित्र

अहवाल सादर करण्याचे खंडपीठाचे निर्देश

औरंगाबाद : माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेसह तिच्या पुरुष अर्भकाचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीत औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. के. के. सोनवणे यांनी या प्रकरणी २२ जुलैपर्यंत स्त्री-रोग तज्ज्ञांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.

रामेश्वर एखंडे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांची पत्नी मीरा एखंडे (वय ३८) यांना २८ डिसेंबर २०१८ रोजी प्रसूतीसाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीदरम्यान पुरुष अर्भकाचा आणि प्रसूतीनंतर मोठय़ा प्रमाणात झालेल्या रक्तस्रावामुळे आईचा मृत्यू झाला होता. या दोघांचा मृत्यू डॉ. रुद्रवार आणि डॉ. साबळे यांच्या वैद्यकीय हलगर्जीपणामुळे झाला असल्याची तक्रार रामेश्वर यांनी पोलीस ठाण्यात दिली. तसेच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडेसुद्धा त्यांनी अर्ज दिला. मात्र, त्यावर कारवाई न मिळाल्यामुळे रामेश्वर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर आणि अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी, डॉ. साबळेतर्फे अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे आणि शासनातर्फे सहायक सरकारी वकील महेंद्र नेरलीकर काम पाहत आहेत.

First Published on July 4, 2019 1:08 am

Web Title: woman dies during pregnancy in rural hospital zws 70