माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. सर्वत्र याचा उत्साह पाहायला मिळत आहे. औरंगाबादमधील अभिनव इंटरनॅशनल स्कुलमध्ये बालदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्त्री जन्माचं महत्त्व सांगण्यासाठी शाळेत ‘बाहुलीचे बारसे’ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. एका अनोख्या पद्धतीनं चिमुकल्यांनी कार्यक्रमात स्त्री जन्माचा जागर केल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी स्त्री- भ्रूणहत्या, मुलगी जन्माचा आनंदोत्सव, मुली वाचवा- मुली शिकवा, असे सामाजिक संदेश देण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी ‘मुलगी हवी हो’ नाटिका सादर केली. शिक्षक- विद्यार्थी यांच्यासोबतच कार्यक्रमात मुलांच्या पालकांनी विशेष सहभाग नोंदवला. शाळकरी विद्यार्थिनी झाशीची राणी, जिजाऊ, यशोदा, देवकी, इंदिरा गांधी अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.