पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडून चौकशी

आष्टी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशाने पोलीस निरीक्षकासह तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन काही तास उलटताच सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध एका महिलेने थेट बलात्काराची लेखी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे दिल्याने जिल्हा हादरला. पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी शनिवारी थेट बीडमध्ये येऊन रात्री महिलेच्या तक्रारीची सखोल चौकशी केली. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींविरुद्ध आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होणार की नाही, या बाबतची गोपनीयता पोलीस प्रशासनाने राखली असून, रविवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नसून, प्रकरण चौकशी स्तरावर असून आता वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.

बीड जिल्ह्यतील आष्टी पोलीस ठाण्यात चार महिन्यांपूर्वी कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने तत्कालीन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलीस शिपाई उद्धव गडकर आणि पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे यांनी आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार जिल्हा न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तिघांविरुद्धही आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा तालुक्यातील सोलापूरवाडीच्या गायरानातील अतिक्रमणाबाबत केलेल्या कारवाईच्या द्वेषातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. या गुन्ह्यची शाई वाळत नाही तोच आष्टीतील सत्ताधारी पक्षाच्या विद्यमान लोकप्रतिनिधी व एका पोलीस अधिकाऱ्याविरुध्द एका महिलेने थेट सरबतातून गुंगीचे औषध देऊन आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार थेट पोलीस अधीक्षकांकडे केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी शनिवारी दुपारी बीड गाठले. पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारदार महिलेची माजलगावच्या उपाधीक्षक भाग्यश्री नवटाके यांनी बंद खोलीत चौकशी केली.  पोलीस महानिरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून महिलेच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याबाबतची चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींविरुद्ध थेट बलात्काराची तक्रार आल्याने पोलीस प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता. तक्रारदार महिला ही मूळ नाशिकची असून ती कामाच्या शोधार्थ असतानाच तिची आष्टीतील एका महिलेशी ओळख झाली. या महिलेच्या मुलाबरोबर तिचे लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर घरात राहायचे असेल तर आम्ही सांगतो तसे वागावे, असा दबाव टाकून तिला वेगवेगळय़ा लोकांशी भेटवण्यात आल्याचा आरोप तिने लेखी तक्रारीत केला आहे. लग्नानंतर काही दिवसांतच आष्टीत राजकीय पुढाऱ्याबरोबर भेट घालून देण्यात आली. पाहुणचार म्हणून दिलेल्या सरबतामध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आला. अन्य एका पोलीस अधिकाऱ्यानेही आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेने बीड जिल्ह्यत खळबळ उडाली असून पोलीस काय कारवाई करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

शिवसेना पीडित महिलेच्या पाठीशी – सचिन मुळूक

आष्टी तालुक्यातील विद्यमान लोकप्रतिनिधींविरुद्ध तक्रार देऊन चार दिवस लोटले तरी पोलीस चौकशीच्या नावाखाली गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या महिलेला न्याय मिळावा, यासाठी आपण शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्यासह वरिष्ठांकडे याबाबतची संपूर्ण माहिती पाठवली आहे. या प्रकरणात कोणी कितीही मोठा असला तरी पीडित महिलेला न्याय मिळावा, यासाठी शिवसेना सदरील महिलेच्या पाठीमागे उभी राहील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिली.