अंगणवाडी सेविका, मदतनिसांची यशस्वी मोहीम

बिपीन देशपांडे लोकसत्ता

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि महिला-बालकल्याण विभागाचे सध्या एक काम तसे सारखेच. शाळा-अंगणवाडीतील मुलांपर्यंत धान्य पोहोचवण्याचे. यात शिक्षण विभाग मागे दिसतो तर महिला व बालकल्याण अनेक पावलेपुढे. या विभागाअंतर्गत राज्यातील १८ जिल्ह्य़ांमधील अंगणवाडय़ांमध्ये आजपर्यंत धान्य वितरणाचे काम पूर्ण झाले असून येत्या चार ते पाच दिवसांत उर्वरित जिल्ह्य़ांमध्येही एप्रिलसह मे महिन्यापर्यंतचा धान्याचा पुरवठा झालेला असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये प्रमुख भूमिका ठरतेय ती अंगणवाडी सेविका व मदतनिसांची.

आजच्या परिस्थितीत करोनाविषयीची जनजागृती करण्यासह बालकांचे लसीकरण, जन्म व मृत्यूची नोंद करणे, गर्भवती, स्तनदा मातांच्या आरोग्यासह त्यांच्या आहाराचीही काळजी घेणे ते सहा महिन्यांपर्यंतच्या बालकांसह ६ वर्षांच्या मुलांना त्यांचा आहार मिळतो की नाही, येथपर्यंतचे काम अंगणवाडी सेविका व मदतनिसांना पाहावे लागते. या कामाचे मानधन मिळत असले तरी माणसाच्या आरोग्याशी संबंधित हे काम असून त्यामध्ये करोनासारख्या परिस्थितीत जोखीमही तेवढीच आहे. त्यातूनही अंगणवाडय़ांमधील मुलांपर्यंतच्या गहू, तांदूळ, मटकी-चना, तेल, तिखट-मीठ, हळद, अशा पोषण आहारातील धान्यांचा पुरवठाही त्यांना करावा लागतो आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे अंगणवाडी व मदतनिसांची यंत्रणा असल्यामुळे त्यांना वाडी-वस्ती-तांडय़ावर असलेल्या अंगणवाडय़ांमधील लाभार्थी मुले, महिलांपर्यंत धान्य पोहोचवता आले आहे. मात्र, शिक्षण विभागाकडे अशी यंत्रणा नसून त्यांना ग्रामसेवकांमार्फत धान्य पोहोचवण्याचे आदेश काढावे लागले आहेत. त्यात शिक्षण आयुक्तांनी गुरुवारीच शिक्षणाधिकाऱ्यांशी दूरचित्रसंवाद साधत शिजवलेला आहार देऊ नका व धान्यही पुढील आदेश येईपर्यंत वितरित करू नका, अशी भूमिका घेतल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

दुसरीकडे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारीही येत आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांमार्फत धान्य वितरित करण्याचे आदेश काढले आहेत. तर उस्मानाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणे किती आवश्यक असून उस्मानाबाद हा निती आयोगाच्या यादीतील जिल्हा असल्याकडे लक्ष वेधत प्रश्नाच्या गंभीरतेबाबत अवगत करावे लागले आहे. बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व औरंगाबाद मनपा आयुक्तांनाही पोषण आहार देण्यास मंजुरी द्यावी, असे पत्र शिक्षण संचालकांना पाठवावे लागले आहे.

राज्यात एक कोटी १० लाख विद्यार्थिसंख्या असलेल्या शिक्षण विभागाला पोषण आहार योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचताना कसरत करावी लागत आहे. किंबहुना त्यांच्याकडे वितरण करता येईल, अशी यंत्रणाही नाही. तर करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी असताना आणि गर्दी टाळण्याचे आव्हान असतानाही महिला व बालकल्याण विभागाने मात्र अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मदतीने साथसोवळ्याचे अंतर राखत (सोशल डिस्टन्सिंग), मास्क लावणे, हात धुणे, अशी काळजी घेण्याचे निर्देश देऊन आहाराचे धान्य पोहोचवले आहे.

औरंगाबाद, बीडमध्ये धान्याचे वितरण

औरंगाबाद जिल्ह्य़ातील ३४५४ अंगणवाडय़ांमधील लाभार्थ्यांना तेवढय़ाच अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या माध्यमातून पोषण आहारातील धान्य पोहोचवले आहे, असे जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकल यांनी सांगितले तर बीडमधील २९५१ अंगणवाडय़ातील लाभार्थ्यांपर्यंत धान्य वितरित करण्यात आल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण यांनी सांगितले. बीडमध्ये ७०० मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले आहे.