घरात लग्नाची लगबग सुरु असताना चुकून कचरा समजून फेकून दिलेले तीन तोळयाचे मंगळसूत्र सफाई कामगारांच्या मेहनतीमुळे महिलेला परत मिळाले. औरंगबादमध्ये शनिवारी २६ जानेवारी रोजी ही घटना घडली. स्वामी विवेकानंदनगर हडको येथे रहात असलेल्या मंजू प्रशांत गायकवाड यांच्या दीराचे २६ जानेवारीला लग्न होते. नवरदेवाला हळद लावण्याच्या दिवशी घरातल्या लक्ष्मीलाही हळद लावण्याची प्रथा आहे. दागिने हळदीच्या पाण्यातून काढले की चमकतात अशी समज आहे.

मंजू यांनी त्यांचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र २५ तारखेला हळदीच्या पाण्यात भिजत ठेवले होते. दुसर्‍या दिवशी मंजू यांच्या सासूबाईंनी भांडी आवरत असताना मंगळसूत्र असलेली वाटी कचर्‍याच्या बादलीत रिकामी केली. तेवढ्यात घंटा गाडी आली कचरा घेऊन गेली. लग्नाची वरात निघताना मंजू यांना मंगळसूत्र घालायचे आहे हे लक्षात आले. त्यांना वाटी दिसली नाही.

तेवढ्यात सासूबाईंनी खुलासा केला मी ती वाटी कचर्‍याच्या बादलीत सकाळीच रिकामी केली. वरातीला पुढे पाठवत मंजू आणि त्यांचे पती प्रशांत यांनी कचरा ट्रक जवळ जात घडलेली घटना सांगितली. त्यावेळी सफाई कामगार सखाराम म्हस्के, सुरेंद्र भालेराव,रावसाहेब आढावे, रमेश गवई, कडूबा वाघमारे, मधूकर म्हस्के यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत दीड तासात ट्रक रस्त्याच्या कडेला पालथा करुन मंगळसूत्र शोधून दिले. मंगळसूत्र मिळाल्याचा आनंद मंजू यांच्या चेहर्‍यावर लपंत नव्हता. त्यांनी कामगारांना बक्षीस देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी घेतले नाही. म्हत्वाचं म्हणजे या कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. बचत गटामार्फत महापालिकेत हे कामगार काम करतात.