औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार,  कुटुंबीयांकडून मात्र अद्याप तक्रार नाही

औरंगाबाद : औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सोमवारी मध्यरात्री प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला स्ट्रेचर उपलब्ध झाले नसल्यामुळे पायऱ्या चढत असतानाच ती प्रसूत झाली आणि बाळ तेथेच दगावले. याबाबत कुटुंबीयांकडून कुठलीही तक्रार पुढे आलेली नाही. दरम्यान, दगावलेले बाळ स्त्री अर्भक होते, अशी माहिती असून त्याला घाटीतील प्रसूती विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा व डॉ. माधवी देशपांडे यांनी दुजोरा दिला आहे.

छावणी परिसरातील एक महिला तिसऱ्या वेळी प्रसूतीसाठी घाटीमध्ये सोमवारी मध्यरात्री दाखल झाली होती. तिला अस प्रसूती कळा सुरू होत्या, पण प्रसूती विभागाकडे नेण्यासाठी तेथे स्ट्रेचर उपलब्ध नव्हते. त्यामुळे ती महिला चालतच तिसऱ्या मजल्यावर निघाली. प्रसूती विभागाच्या दिशेने जात असताना एका मजल्यावरील पायऱ्या चढत असतानाच मध्येच ती महिला बसली आणि तेथेच एक अस कळा आल्याने ती प्रसूत झाली. तिचे नवजात बाळ दगावले. तिला वेळेत स्ट्रेचर उपलब्ध झाले असते तर बाळ वाचले असते, असे काहींचे म्हणणे आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) बऱ्याच विभागात पुरेशी स्ट्रेचर उपलब्ध नाहीत. प्राप्त माहितीनुसार अपघात कक्षात एकूण १९ स्ट्रेचर असून त्यातील १२ स्ट्रेचर बऱ्या स्थितीत आहेत. उर्वरित स्ट्रेचर वापरण्यायोग्य नाहीत. घाटीत यापूर्वी एका मुलीला आपल्या वडिलांचे सलाइन अडकवण्यासाठीचे माध्यम खाटेला नसल्यामुळे ते हातात घेऊन उभे राहावे लागले होते. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. मंगळवारी एका जवानाचा मृत्यू झाला. त्याच्या उपचारातही हयगय केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून झाला होता. रुग्णांसाठी बहुतांश औषधे तर बाहेरून खरेदी करून आणण्यास डॉक्टर सांगतात. पुरेसा औषधसाठा अजूनही घाटीत उपलब्ध नाही. प्रसूती विभागासाठी जादा खाटांना मंजुरी द्यावी, अशी मागील काही वर्षांपासूनची मागणी आहे. येथे दरवर्षी साधारण १८ हजार महिलांची प्रसूती होते. ही संख्या औरंगाबादेतील एकूण सर्व खासगी महिला रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतीच्या संख्येपेक्षा अधिक आहे. घाटीत येणाऱ्या अनेक महिलांना प्रसूतीनंतर दुसऱ्या महिलेसाठी खाट उपलब्ध व्हावी म्हणून खाली जागा करून दिली जाते. अशा अनेक तक्रारी येथे ऐकायला मिळतात.

संबंधित महिलेचे जन्मलेले अर्भक खाली पडल्यामुळे दगावलेले नाही. त्याच्या डोक्याला किंवा इतर कुठल्या अवयवाला बाहेरून दुखापत झालेली नव्हती. कोणतीही महिला प्रसूत होताना बाळ खाली पडून दगावण्याची शक्यता दुरापास्त आहे. आम्ही तरी अजून अशा प्रकारची प्रसूती पाहिलेली नाही.

 – डॉ. श्रीनिवास गडाप्पा, प्रसूती विभागप्रमुख, घाटी.