चिकलठाणा परिसरातील लकी पार्क येथील गोदामात ठेवलेल्या रसायनाचा स्फोट होऊन एक महिला ठार झाली. ही घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मीरा ज्ञानेश्वर रुद्रके (वय ४४) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान हा स्फोट कशामुळे झाला हे समजू शकले नाही.

चिकलठाणा परिसरात ज्ञानेश्वर रुद्रके यांचा जुने ड्रम खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. रिकामा ड्रम हलविताना त्यातील रसायनांमुळे हा स्फोट झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

ही घटना कळताच पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन मुंडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्फोटात गंभीर जखमी मीरा रुद्रके यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.

मात्र, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोट झालेल्या रिकाम्या ड्रमचे तुकडे पोलिसांनी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत.