08 March 2021

News Flash

‘आदेश दिल्यानंतरही कामे नाहीत’; आमदारांची पालकमंत्र्यांकडे तक्रार

महापालिकेच्या वतीने २०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाल्याची आठवण करून देण्यात आली.

 

पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही कामे होत नसल्याची तक्रार जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत आमदारांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच केली. विशेषत: जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयातील विविध प्रश्नी अनेकदा पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याचा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला. भाजप आमदार अतुल सावे यांनीही दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी इमारतीच्या विद्युतीकरणासह उपकरणांनाही अधिक निधीची मागणी केली.

जिल्हा वार्षिक आराखडय़ाच्या बैठकीत पूर्वी मांडलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार होत नसल्याकडे आमदार जलील यांनी लक्ष वेधले. शहरात दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी इमारत तयार आहे. मात्र, या इमारतीच्या विद्युतीकरणासाठी पुरेसा निधी नसल्याने ही इमारत वापरता येत नसल्याकडे लक्ष वेधले.

या इमारतीच्या विद्युतीकरणासाठी एक कोटी ६० लाख रुपयांची आवश्यकता आहे. याची माहिती घेऊन प्रस्ताव पाठविण्याची सूचना पूर्वी करण्यात आली होती. मात्र, काहीच घडले नाही.

महापालिकेच्या वतीने २०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाल्याची आठवण करून देण्यात आली. रुग्णालयासाठी शासकीय जागा उपलब्ध होत नसल्याचे आमदार सावे यांनी सांगितले. यावर बैठकीत आवर्जून उपस्थित असणारे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी, सेंट्रल नाक्याजवळील जागा देण्यास हालचाली सुरू होत्या त्याचे काय झाले, असा सवाल केला. तेव्हा ही जागा वादात असल्याचे सांगण्यात आले.

घाटी रुग्णालयाची इमारतही अनेक ठिकाणी खराब असल्याचे सांगण्यात आले. या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच २०० खाटांच्या रुग्णालयासाठी १५ दिवसांत जागा शोधण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी सोमवारी पुन्हा दिले.

शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

वार्षिक आराखडा बैठकीपूर्वी वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील शेतकरी सुभाष मदनराव साठे या शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सटाणा येथे संपादित जमिनीवरील अनधिकृत विहिरी बुजवाव्यात व अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी होती. रॉकेल अंगावर ओतून घेताना पोलिसांनी त्यास अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2016 1:54 am

Web Title: work pending in aurangabad
टॅग : Aurangabad
Next Stories
1 फारशी चर्चा न होताच २६६ कोटींच्या आराखडय़ास मंजुरी
2 मोहन मेघावाले शिवसेनेचे स्थायी सभापतीचे उमेदवार
3 चार तालुक्यांत मुलींच्या जन्मदरात ८९२ पर्यंत घट
Just Now!
X