सुहास सरदेशमुख लोकसत्ता
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे रिक्षाचालकांचे आयुष्य अधिक कष्टदायक होऊ लागलेआहे. वाढलेला खर्चाची मिळवणी करण्यासाठी रिक्षाचालकांच्या कामाचे दररोज तीन तासाने वाढले आहे. औरंगाबादमधील पेट्रोलचा दर ९५.२७ एवढा असून त्यामध्ये प्रतिलिटर १५ रुपयांचे ऑइल टाकावे लागते. त्यामुळे ११० ते ११५ रुपये लिटर पेट्रोलचा खर्च मिळणाऱ्या नफ्यातून वजा होऊ नये म्हणून कामाचे तास वाढवावे लागत आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात ३१ हजार ३८ ऑटोरिक्षा असून त्यातील केवळ ९ हजार ९६२ रिक्षांना एलपीजी जोडणी आहे. टाळेबंदीनंतर रिक्षाचालकांचे अर्थकारण अधिक आक्रसले असल्याचे रंगार गल्लीत राहणारे अशोक ढंगारे म्हणाले ‘पूर्वी एक लिटर पेट्रोल टाकल्यानंतर २०० रुपयांपर्यंत रक्कम हाती पडत असे. आता दिवसभरात आठ-दहा तास रिक्षा चालवल्यानंतरही १०० रुपयांपेक्षाही अधिक रक्कम मिळत नाही. घर भागत नाही. म्हणून सिंधी कॉलनीमध्ये रात्री सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करत आहे,’ असेही गंगरेम्हणाले.
वयाच्या ६२ व्या वर्षी रिक्षा चालवणारे अब्दुल रहीम अब्दुल करीम म्हणाले, ‘एक मुलगा गॅरेजवर कामाला जातो आहे. त्यामुळे त्याची काही रक्कम घरी येते. दोघांचे मिळून कसेबसे भागते. पण पूर्वी सकाळी दहा वाजता रिक्षा बाहेर काढायचो आणि संध्याकाळी सात वाजता बंद करायचो. आता सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत प्रवासी वाहतूक केली तरी पुरेसे पैसे मिळत नाही. कारण वाढलेला पेट्रोलचा दर. याशिवाय परवाना शुल्क, विमा याचे खर्च वेगळे आहेत. पेट्रोलची रिक्षा परवडत नाही. पण पर्याय नाही.’ करोना काळात नातेवाइकांनी दिलेल्या मदतीवर गुजराण झाली. मग काही दिवस टाळेबंदीनंतर कोणी रिक्षात बसायला तयार नव्हते. गजबजलेल्या ठिकाणीही आता ग्राहकांची वाट पाहण्याचा वेळ वाढला आहे. रिक्षाचे हप्ते, त्याचे व्याज या कटकटीच्या बाबी आहे तशा आहेतच. नव्याने पेट्रोलचा दर वाढत चालला आहे. रिक्षा चालकांसाठी इंधनावरचा प्रतिलिटर खर्च कधीच शंभरीपार गेला आहे. अर्थकारण आक्रसले आहे. जुन्या रिक्षांवर काम करणाऱ्यांचे हाल तर दिवसेंदिवस वाढताहेत. मोहम्मद फईम म्हणाले, ‘अधिकचे कष्ट करून तीन फार तर साडेतीन हजार रुपये शिल्लक राहतात. मुलगा मोहम्मद फैजान एका भ्रमणध्वनीच्या दुकानात काम करतो. त्याचा मालक चांगला आहे. अधूनमधून उचल देतो. त्यामुळे पत्नीच्या मधुमेहावरील औषधांचा खर्च कसाबसा भागतो. आता जगण्यासाठी अधिक कष्ट करावे लागत आहेत.’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 11, 2021 12:07 am