औरंगाबाद : शिवजयंतीच्या मिरवणुकीत झेंडय़ावरून झालेल्या किरकोळ वादातून श्रीकांत गोपीचंद शिंदे (वय २१) या तरुणाचा चाकू भोसकून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास हनुमान चौक ते पुंडलिकनगर रस्त्यावर घडली. या प्रकरणी रात्री उशिरा मृत श्रीकांतचा भाऊ सूरज याच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना केली होती. त्यातून पोलिसांना विजय वैद्य हा आरोपी हाती लागला. तर दुसराही आरोपी अटक केल्याशिवाय श्रीकांतचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र त्यांची पोलिसांनी समजूत घातल्यानंतर मृतदेह स्वीकारला.

दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी राहुल भोसले याचाही ठावठिकाणा हाती लागला असून त्याला रात्रीपर्यंत अटक केलेली असेल, असे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.

हुसेन कॉलनीत राहणारा मृत श्रीकांत हा गारखेडा परिसरातून निघणाऱ्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सायंकाळी घरातून बाहेर पडला. मिरवणुकीत तो मोठा भगवा झेंडा हातात घेऊन फिरवत होता. त्याला विजय ऊर्फ छोटू शिवाजी वैद्य (रा. केंब्रिज चौक, चिकलठाणा) याने झेंडा फिरविण्यासाठी मागितला. मात्र, श्रीकांतने त्याला झेंडा द्यायला नकार दिला. त्यातून विजय ऊर्फ छोटू आणि राहुल भोसलेसोबत श्रीकांतचा वाद झाला. या वादातून विजय ऊर्फ छोटू आणि राहुलने श्रीकांतच्या छातीत चाकूने वार केला. यात श्रीकांत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच श्रीकांतच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर श्रीकांतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. श्रीकांत हा बी. ए. चे शिक्षण घेत होता.

घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड हेही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी चार पथके तैनात करण्यात आली.

पोलिसांनी गुरुवारी पहाटे विजय वैद्य याला अटक केली. तर राहुल भोसलेचा शोध लागला असून तो लवकरच हाती येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले. विजय हा नुकताच एका नामांकित औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत कामाला लागला होता. त्याच्याविरुद्ध तीन दिवसांपूर्वीच पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात एका तरुणाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्याला अटक झालेली नव्हती.