औरंगाबाद : दिवाळीच्या दिवशीच २८ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना २८ ऑक्टोबरच्या रात्री सव्वाबाराच्या सुमारास गारखेडा परिसरातील न्यायनगर भागातील गल्ली नंबर ११ येथे घडली. सचिन विष्णू वाघ असे मृत तरुणाचे नाव आहे.

हनुमाननगरातील साईनाथ आनंदा येळणे, नीलेश ऊर्फ सुऱ्या नारायण राजणे, न्यायनगरातील पवन अनिल दिवेकर, रोहित दिलीप नरवडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

रविवारी लक्ष्मी पूजनाच्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास चारही आरोपी न्यायनगर येथून पायी जात होते. त्या वेळी मृत सचिन व त्याचा भाऊ घराजवळ उभे होते. त्या वेळी सचिन वाघ याने पायी जाणाऱ्या चौघांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावरून चौघांनी सचिन वाघ व त्याच्या भावासोबत वाद घालून भांडण करण्यास सुरुवात केली.

वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्यावर चौघांनी आपल्याजवळील धारदार शस्त्राने सचिन वाघ याच्यावर हल्ला केला.

या मारहाणीत सचिनच्या छातीवर आणि पोटावर सहा वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला होता. सचिन वाघ याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले असता उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सचिनचा मृत्यू झाला.

पोलिसांनी नांदेडला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.