एकाच महिलेची दहा बनावट खाती

औरंगाबाद : वेगवेगळ्या व्हॉट्स अ‍ॅपच्या ग्रुपमधील लोकांचे मोबाइल क्रमांक व नावाच्या आधारे फेसबुक खाते शोधून ते हॅक करणाऱ्या उच्चशिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांस ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केली. एका महिलेची दहा बनावट फेसबुक खाती काढून त्यावरून तिची बदनामी केल्याची तक्रार पुढे आल्यानंतर आरोपीने अनेकांचे फेसबुक खाते उघडून ते हॅक केल्याची माहिती पोलिसांसमोर आली.

ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार नीलेश ज्ञानेश्वर दाभाडे असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पठण तालुक्यातील धूपखेडा येथील मूळचा रहिवासी आहे. औरंगाबादमध्येच तो एका नामांकित महाविद्यालयात बीएसस्सी शाखेत शिक्षण घेत आहे. त्याने आतापर्यंत अनेकांचे फेसबुक खाते हॅक केले आहे. तसेच त्यावरून पीडित महिलेचे अश्लील फोटो व संदेशही हॅक केल्याचे समोर आले. पीडित महिलेने बिडकीन येथे सुरुवातीला २५ फेब्रुवारी रोजी फेसबुक खाते हॅक केल्याचा तक्रार अर्ज केला होता. त्यावरून पीडित महिलेचे फेसबुक खाते बंद करण्यात आले. मात्र पुन्हा तिच्या नावाचे बनावट फेसबुक खाते काढण्यात आल्याचे समोर आले.  बिडकीन पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली. त्यावरून आय टी अ‍ॅक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास औरंगाबाद ग्रामीणच्या सायबर सेलच्या निरीक्षकांकडे सोपवण्यात आला. सायबर गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक घुगे, उपनिरीक्षक मोहसीन सय्यद आदींनी तपास केला असता नीलेश दाभाडे हा बनावट फेसबुक खाते काढत असायचा. तसेच इतरांचे फेसबुक खाते हॅक करायचा, याची माहिती मिळाली. शहरात त्याला शिताफीने पकडण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यत वापरलेले मोबाइल, रोख ७५० रुपये जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तर फेसबुक खाते हॅक केले तर पोलीस विभागाशी संपर्क करावा. त्यातही विशेषत: महिलांनी याबाबत जागृत राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.