मटका खेळण्यासाठी बनावट नोटा वापरण्यात येत असल्याची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांनी सापळा रचून एका ३५ वर्षांच्या युवकास ५५ हजारांच्या नोटांसह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिद्धेश्वर पंडित कबाडे असे आरोपीचे नाव आहे.
खुदावाडी येथील रहिवासी व सध्या पुण्यातील नरेगाव येथे बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेल्या सिद्धेश्वर पंडित कबाडे हा पत्नी माहेरी आल्यामुळे तिला घेऊन जाण्यासाठी खुदावाडी येथे आला होता. दरम्यान, सोमवारी दुपारी अणदूर येथे एका ठिकाणी २० हजार रुपयांचा मटका लावून तो आणखी मटका खेळण्यासाठी जळकोट येथे जात होता. मात्र अणदूर येथे दिलेल्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधिताने जळकोट येथील बुकी एजंटला याबाबतची माहिती दिली. त्या वेळी जळकोट येथे दिलेल्या नोटाही बनावट असल्याचे उघड झाले. तोपर्यंत काही खबऱ्यांमार्फत ही माहिती पोलिसांपर्यंत गेली. यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे विनानंबरच्या पांढऱ्या रंगाच्या होंडा स्कुटीवरून येत असलेल्या सिद्धेश्वर कबाडे यास अटक केली. त्याच्याकडून ३० हजारांच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्या. यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे काक्रंबा येथील त्याच्या नातेवाइकांच्या घरी छापा टाकला असता, त्यांच्याकडून २५ हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या. अशा एकूण ५५ हजारांच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या. यामध्ये एक हजार रुपयांच्या ४९ तर ५०० रुपयांच्या १२ नोटांचा समावेश आहे.