औरंगाबाद : दुचाकी रस्त्यामध्ये अडवून चार ते पाच चोरटय़ांनी गुरुवारी मध्यरात्री सेन्ट्रल नाका परिसरात केलेल्या बेदम मारहाणीत २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नितीन उर्फ बाळू भीमराव घुगे असे मृत तरुणाचे नाव आहे. नितीन हा मूळचा कन्नड येथील रहिवासी असून सध्या तो जाधववाडी परिसरात राहात होता. पोलिसांकडून ट्रकमालक आणि मृत तरुणाच्या भावाचे जाबजबाब नोंदविणे सुरू असून जबाबात मोठी तफावत समोर येत असल्याची माहिती मिळाली.

बाळू हा भाऊ सचिनसह किरायाने टीव्ही सेंटर भागात राहत होता. तो शहरातील एका कंत्राटदाराकडे मालमोटारीवर चालक म्हणून कामाला होता. गुरुवारी मध्यरात्री कंत्राटदाराने कचरा घेऊन जायचा आहे, लवकर ये असे म्हणून बाळूला बोलावले होते. कामाला जायचे असल्याने १० मिनिटांत येतो असे भावाला सांगून बाळू घरातून निघाला. मात्र रात्रीचे दोन वाजून गेले तरी तो घरी का आला नाही, म्हणून भावाने त्याला फोन केला. मात्र बाळूचा मोबाईल बंद येत होता. शुक्रवारी सकाळी कंत्राटदाराने अपघात झाल्याचे सांगितले. त्यामुळे घटनेची माहिती मिळाली, अशी माहिती मृत बाळूचा भाऊ सचिन घुगे याने दिली.

बाळू हा दुचाकीवरून कामाला जात असताना त्याला सेन्ट्रलनाका भागात चार ते पाच चोरट्यानी अडविले होते. चोरटय़ांनी बाळूला बेदम मारहाण केली. त्याने आरडाओरड केल्याने चोरटय़ांनी पळ काढला. त्यानंतर त्याने घडलेली सर्व घटना कंत्राटदाराला व मित्राला सांगितली. मारहाणीमुळे त्रास होत असल्याने मित्रांनी त्यास शहानूर मिया दर्गा परिसरातून औषधी दुकानातून दुखणे थांबण्याची गोळी आणून दिली. त्यानंतर त्यास अस्वस्थ वाटत असल्याने घाटी रुग्णालायत दाखल केले. मात्र,तेथे त्याला तपासून मृत घोषित केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घाटीत जाऊन मृतदेहाची पाहणी केली. या प्रकरणी दुपापर्यंत मित्र, कंत्राटदार व संबंधित व्यक्तींची जाबजबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी म्हणाल्या,की आम्ही सर्व शक्यता तपासून पाहत आहोत. जाबजबाब नोंदविल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती दिली.