पाटोदा नगर पंचायत अंतर्गत धनगरजवळका या गावाला जोडणारा अवघ्या दीड किलोमीटरचा रस्ता वर्षानुवर्ष मागणी करुनही दुरुस्त केला जात नाही. नगर पंचायत कोट्यावधी रुपये विकास कामांवर खर्च करत असली, तरी रस्त्याच्या कामाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे या परिसरातील नागरिकांना, वयोवृद्धांना, मुलांना पावसाळ्यात चिखल तुडवत जाण्याची वेळ येते. त्यामुळे दोन तरुणांनी थेट चिखलात लोळत, ढोल वाजवून प्रशासनाचा निषेध करत रस्ता करण्याची मागणी केली. आता तरी नगरपंचायत रस्ता करील का? याकडे लक्ष आहे.

बीड जिल्ह्यात मागच्या पाच वर्षात रस्त्याच्या कामावर काही हजार कोटी रुपये खर्च केल्याचा दावा तत्कालीन सत्ताधारी नेत्यांकडून सातत्याने केला गेला. प्रत्यक्षात मात्र हजारो कोटी रुपये खर्च करुनही शहरालगतच्या गावात जाण्यासाठीही चिखल तुडवावा लागतो. हे विदारक सत्य पाटोदा येथील दोन तरुणांच्या आंदोलनाने समोर आले आहे.

नगर पंचायत अंतर्गत घोलपवस्ती, हनुमान वस्ती मार्गे धनगरजवळका या गावाला जोडणारा दीड किलोमीटरचा रस्ता नगर पंचायतीच्या प्रभाग क्र. सहा मध्ये येतो. वर्षानुवर्ष या भागातील नागरिक रस्ता पक्का करावा, यासाठी मागणी करत आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यावरुन गावात येणेच अवघड होते. चिखल तुडवत शाळेतील मुले, नागरिक, वृध्द यांना जाण्याची वेळ येते. नागरिकांची ओरड झाल्यानंतर नगर प्रशासन तात्पुरता मुरुम टाकून दुरुस्ती केल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात मात्र रस्ता दुरुस्त होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. काही दिवसापूर्वी नगर पंचायतीला निवेदन देऊन दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते चांगदेव गिते व अन्य एका तरुणाने थेट रस्त्यावरच्या खड्ड्यात, चिखलात बसून ढोल वाजवत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. अंगाला चिखल माखुन रस्त्यासाठी केलेले आंदोलन समाज माध्यमातून राज्यभर चर्चेत आले असले, तरी स्थानिक प्रशासन आणि राज्यकर्ते याची दखल घेतील का? आणि आता तरी रस्ता होईल का? याकडे आता लक्ष लागले आहे.