मासिक प्रवास दैनंदिनी उशिराने सादर केल्यावरून जिल्हा परिषदेतील १७ विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यात काही तत्कालीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
जि. प.मधील विविध विभागप्रमुखांनी विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांना भेटी देऊन तपासणी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी महिना सुरू होण्यापूर्वीच दौरा सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर महिनाभरात झालेल्या दौऱ्यानंतर मासिक दौरा दैनंदिनी सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, १७ विभागप्रमुखांनी जुल ते सप्टेंबर दरम्यान मासिक दौरा दैनंदिनी सादर केली नसल्याचे उघड झाले. त्यामुळे सीईओंनी २७ ऑगस्टला अर्धशासकीय पत्रही पाठविले होते. त्यानंतर कारणे दाखवा नोटीस देखील पाठविली. परंतु त्यानंतरही विभाग प्रमुखांनी खुलासा सादर केला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा १७ विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.
यामध्ये बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. डी. वाघमारे, एस. बी. वऱ्हाडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता जी. एस. यंबडवार, तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी केंद्रे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता महंमद फयाज, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बनसोडे, डॉ. राहुल गिते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ए. बी. लोणे, डॉ. दिनेश टाकळीकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, कृषी विकास अधिकारी प्रदीप कच्छवे, हमी योजनेचे गटविकास अधिकारी पाटमासे, गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड, विठ्ठल सुरुसे, एन. एन. घुले, सहायक गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे यांचा समावेश आहे. विलंबाच्या खुलाशासह मासिक दौरा दैनंदिन तातडीने सादर करावा अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रधान सचिवांकडे सादर करण्याचा इशारा देण्यात आला.