X
X

ग्रामस्थ-शिक्षक समन्वयाने जि. प. शाळेचा कायापालट

READ IN APP

वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील या शाळेने अद्ययावत व आदर्श म्हणून जिल्हाभर ओळख निर्माण केली आहे.

ग्रामस्थ व शिक्षकांच्या कल्पकता आणि इच्छाशक्तीतून जि. प. प्राथमिक शाळेचा कायापालट घडला. वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील या शाळेने अद्ययावत व आदर्श म्हणून जिल्हाभर ओळख निर्माण केली आहे. शाळेचे नेहमीचे स्वरूप आमूलाग्र बदलले असून, ११ तुकडय़ांमधून इंग्रजी माध्यमातून ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्यापन येथे केले जात आहे.
आडगाव रंजे हे लहानसे गाव. शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे. येथील शेतकरी-शेतमजुरांनी हल्लीचे महागडे शिक्षण आपल्या पाल्यांना देण्यापेक्षा शाळेतच सुयोग्य सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षकांची मदत घेतली. शाळेत काय सुधारणा कराव्या लागतात, या साठी सातारा जिल्ह्यातील कुमठे येथील ज्ञानरचनावादी शाळेला भेट देण्यासाठी गावातून शिष्टमंडळ जाऊन आले. तेथूनच शिक्षकांच्या कल्पकतेतून व उत्तम रचनात्मक्तेच्या आधारे शाळेचा कायापालट करण्याचा संकल्प सोडण्यात आला. त्याचे चांगले फळ आज पाहावयास मिळत आहे.
ही शाळा परिसरात आदर्श म्हणून ओळखली जात असून नवनवे उपक्रम मोठय़ा उत्साहाने येथे राबविले जातात. डिजिटल क्लासरूमसह अनेक संस्कारक्षम उपक्रम शाळेत राबवले जातात. बालवयातच मुलांवर संस्कार करण्याचे कार्य ही शाळा प्रभावीपणे करीत आहे. या शाळेत साने गुरूजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे आठ दिवस सातत्याने वाचन करून मुलांच्या मनावर मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ-शिक्षकांनी शाळेचा कायापालट करण्यास केलेल्या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांकडून १ लाख २५ हजारांची लोकवर्गणी, तर शिक्षकांनी आपल्या वेतनातून २५ हजार रुपये जमा केले. या शाळेत गेल्या ५ वर्षांपासून सेमी इंग्रजीच्या माध्यमातून अध्यापन केले जाते, तर काही महिन्यांपासून ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्यापनास सुरूवात झाली. या अनुषंगाने आता डिजिटल क्लासरुमची निर्मिती करण्यात आली आहे.
‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत श्याम मनोहर, डॉ. राजन गवस, इंद्रजित भालेराव, आसाराम लोमटे, राजकुमार तांगडे, डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी या शाळेला भेट दिली. शाळेतील मुलांनी स्वतंत्र वाचनकट्टा सुरू केला असून सातत्याने इंग्रजीतून संवाद साधत आहेत. परिपाठही इंग्रजीतून सादर करतात हे पाहून या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. खासदार राजीव सातव यांनीही शाळेला भेट देण्याचा मनोदय ग्रामस्थांकडे व्यक्त करून शाळेच्या संरक्षण िभतीसाठी १० लाखांचा निधी जाहीर केला. सातव यांनी नुकतीच शाळेला भेट दिली. त्यांच्या हस्ते शाळेच्या संरक्षण िभतीच्या कामाचे भूमिपूजन व डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. देशमुख, गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे आदींची या वेळी उपस्थिती होती.
शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग भरतात. विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ४५० असून, ११ वर्ग तुकडय़ांतील विद्यार्थी पाच वर्षांंपासून सेमी अध्यापन करीत आहेत. सातव यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. मुलांनी रोखठोक उत्तरे देऊन आपली क्षमता दाखवून दिली.
शाळेचे मुख्याध्यापकपद मात्र रिक्त असून केशव खटींग प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संकल्पनेतून, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे खऱ्या अर्थाने ही शाळा जिल्ह्यात आदर्श म्हणून पुढे आली.

20
X