विद्यापीठातील ११ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांअभावी कायमस्वरूपी बंद

कुलगुरू  डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्यात आली.

६३ व्या वर्धापनदिनीच विद्यापीठावर निर्णय घेण्याची नामुष्की

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत चालवण्यात येणारे विविध ११ अभ्यासक्रम केवळ विद्यार्थी मिळत नाहीत किंवा विद्यार्थी कमी आणि प्राध्यापक अधिक असल्याच्या परिस्थितीमुळे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोमवारीच विद्यापीठाचा ६३ वा वर्धापन दिन होता आणि त्याच दिवशी हा निर्णय घेण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाबाबत काही शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी खासगी विद्यापीठाचे किंवा खासगी बडय़ा शैक्षणिक संस्थांचे हित विद्यापीठाने पाहिले का ? असा प्रश्न उपस्थित करून विद्यापीठाने नॅक प्लस क्रमांक मिळवताना याच अभ्यासक्रमालाही नॅकच्या समितीपुढे ठेवले होते, याची आठवण करून देताना तीव्र नाराजीचा सूूर आळवला आहे.

कुलगुरू  डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विद्यापीठातील विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या काही अभ्यासक्रमास अल्पसा प्रतिसाद असल्याचा मुद्दा बैठकीत चर्चेत आला. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झालेले अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भात विभाग प्रमुखांनी यापूर्वी अनुमती दिल्याने व्यवस्थापन परिषदेत ११ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या माहितीला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. राजेश करपे यांनीही दुजोरा दिला असून विद्यार्थ्यांअभावी अभ्यासक्रम चालवणे म्हणजे पांढरा हत्ती सांभाळण्यासारखी परिस्थिती समोर मांडण्यात आल्यानंतर त्यावर निर्णय घेतल्याचे डॉ. करपे यांनी सांगितले.

हे अभ्यासक्रम बंद

एमएस्सी (मॅथेमॅटिक्स), एम.टेक इंजिनिअरींग (कॉम्प्युटर सायन्स अ?ॅण्ड इंजिनिअरींग), डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (डिबीएम), सर्टिफिकेट कोर्स ऑफ प्रोफीसेन्सी एन रशियन, बी.ए. इंटरनॅशनल (जर्नालिझम अ?ॅण्ड आर्ट अ?ॅण्ड सायन्स युनिस्को कोर्स), बी.एड, एम.एड इन्टीग्रेटेड कोर्स, डिप्लोमा इन टीव्ही प्रोडक्शन अ?ॅण्ड बेसीक फिल्म मेकिंग, बॅचलर ऑफ डान्स, बी.ए (म्युझिक), बॅचलर ऑफ प्रिंटींग टेक्नॉलॉजी अ?ॅण्ड ग्राफिक्स ऑर्ट (बीपीटी अ?ॅण्ड जीए), एमएस्सी नॅनो टेक्नॉलॉजी, या बंद करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश आहे. तर काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमता कमी करण्याबरोबरच अन्य अभ्यासक्रमांमध्ये विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, भविष्यामध्ये असे प्रकार अन्य अभ्यासक्रमांसंदर्भात होऊ नये यासाठी विभागप्रमुखांनी काळजी घेणे गरजेचे आहे. विभागप्रमुखांनी दर तीन महिन्यांला त्यांनी केलेल्या कामाचे अंकेक्षण करावे, अशा सूचना राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी बैठकीत केल्या.

२३ कंत्राटी पद भरणार

विद्यापीठातील विविध विभागांमध्ये जागा रिक्त असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे २३ कंत्राटी पद भरण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी २४ हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार असून ११ महिन्यांचा करार करण्यात येणार आहे. पद भरण्यासाठी कमिटी गठीत करण्यात आली असून व्यवस्थापन परिषद सदस्यांमध्ये डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. फुलचंद सलामपुरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 11 courses university permanently closed lack students ssh

ताज्या बातम्या