औरंगाबाद : गडचिरोलीतील १३ तरुणी या टाळेबंदीच्या निर्णयानंतर औरंगाबादेत अडकून पडल्या. नोकरी देणाऱ्या त्यांच्या कंत्राटदारानेही गावी परतण्यासाठी आणि जेवणासाठीही पैसे देण्यास असमर्थता दाखवल्यामुळे त्यांच्यापुढे मोठ्ठाच पेच निर्माण झाला होता. अखेर चिकलठाणा पोलिसांच्या पर्यंत ही माहिती पोहोचल्यानंतर त्यांनी त्या सर्व तरुणींची राहण्यासह महिनाभराच्या रेशन धान्याची व्यवस्था करून दिली आहे.

गडचिरोलीतील वेगवेगळ्या भागातील १३ तरुणी पहिल्यांदाच आपला जिल्हा सोडून साधारण ७०० किलोमीटर दूर असलेल्या औरंगाबादेतील चिकलठाणा परिसरातील एका कंपनीत नोकरीच्या निमित्ताने आल्या आहेत. एका खासगी कंत्राटदारामार्फत त्यांना हे काम मिळाले. काही दिवस कामांत आनंदाने गेले. मात्र, महिना व्हायच्या आतच करोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय झाला. कंपनीतही जाणे बंद झाले. या तरुणींना कामावर नियुक्त केले त्या कंत्राटदारानेही गावी परतण्यास आणि जेवणासाठीही पैसे देण्यास असर्थता दर्शवली. गावीही जायचा प्रश्न तयार झाला. यासंदर्भात चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले की, गडचिरोलीतील त्या १३ तरुणी अडचणीत असल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही त्यांची राहायची व्यवस्था केली. त्यांना एक महिनाभर पुरेल, एवढा अन्नधान्याचा पुरवठा करून दिला. आता त्यांना किमान राहण्याची व जेवण्याची चिंता ठेवली नसून बाकीही सुरक्षा त्यांची जपली जात आहे.

सुरक्षेचा आढावा

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी चिकलठाणा हद्दीतील देवळाई परिसरातील श्रीनिवासनगर येथे करोनाचा रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी परिसराच्या सुरक्षेचा आढावा घेतल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी दिली. यावेळी देखरेख अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहल, गोरश शेळके आदी उपस्थित होते.