scorecardresearch

राज्यात १३४ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू

आरोग्य विभागाची माहिती

swine flu
(संग्रहित छायाचित्र)

आरोग्य विभागाची माहिती

राज्यात १ जानेवारी ते २० एप्रिल २०१७ या ११० दिवसांत १३४ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून १९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात ६८३ रुग्ण आढळून आले असून, त्यातील ४२७ जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. किरकोळ सर्दी, खोकला अंगावर काढू नका, असे आवाहन करून स्वाइन फ्लूचा प्रभाव राज्यात वाढलेला असला तरी ग्रामीण, शहरी भागातील आरोग्य केंद्रात औषधोपचार करणाऱ्या गोळय़ा, लस उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व मनपाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेनंतर राज्याचे सहायक संचालक डॉ. नितीन बिलोलीकर, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, मनपाच्या डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. बिलोलीकर म्हणाले, स्वाइन फ्लूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व त्याबाबत जनजागृती करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आजाराबाबत घाबरण्याचे कारण नसले तरी काळजी घ्यावी लागणार आहे. मे, जून-जुलैपर्यंत स्वाइन फ्लूच्या वाढत्या तापमानाने प्रभाव कमी होणारा असला तरी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभागाने टॅमी फ्लूसारखी औषधे, लस सर्वच आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिलेली आहेत. लसही उपलब्ध आहे. अनेक ठिकाणी रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहेत. मास्क वापरू नका आणि फेकूनही देऊ नका. मुलांच्या हाती पडली तर त्यांनाही आजार होण्याची शक्यता अधिक असते. स्वाइन फ्लूचा विषाणू (इन्फ्ल्युएंझा ए एच-१ एन-१) थुंकी, शिंक यांच्या थेंबातून पसरत असून शहरासह ग्रामीण भागातही प्रसार वाढत चालला आहे. विशेषत: मधुमेह, कॅन्सर, अस्थमा, गरोदर माता यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉ. बिलोलीकर यांनी केले. थेट घाटीत गर्दी करू नये, घाटी हे प्रशिक्षण केंद्र आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. प्रदीप औटे यांना राज्यातील रुग्णसंख्येबाबत विचारले असता ते म्हणाले, १ जानेवारी ते २० एप्रिल २०१७ या कालावधीत ६८३ रुग्ण आढळून आले आहेत. ४२७ बरे होऊन गेले आहेत. १०७ जणांवर उपचार सुरू असून १९ जण व्हेंटिलेटरवर आहेत. १३४ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. सर्दी, खोकला किरकोळ वाटत असला तरी तो अंगावर काढू नये आवाहन त्यांनी केले.

मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी ऐनाथराव आरोग्य केंद्र सिडको-हडको, कैसर कॉलनी, सिल्क मिल कॉलनी येथील मनपाच्या केंद्रात लसही उपलब्ध असल्याचे सांगितले.

पुणे माहेरघर

पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र २००९ पासून पुणे हे स्वाइन फ्लूचे माहेरघर बनले आहे. स्वाइन फ्लूची सुरुवात पुण्यातून होते. २००९ साली एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. आताही अधिक रुग्ण पुण्यात आहेत. पूर्वी सहा फुटाच्या आत रुग्णाच्या सहवासात व्यक्ती आली की त्यालाही लागण व्हायची. आता हा विषाणू हवेतून पसरत असून पुण्यानंतर नाशिक, औरंगाबाद येथे अधिक रुग्ण आहेत, असे डॉ. नितीन बिलोलीकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-04-2017 at 01:33 IST
ताज्या बातम्या