औरंगाबाद : येथील हर्सूल भागातील औरंगाबाद मध्यवर्ती विभागीय कारागृहातील १२ कैदी रविवारच्या चाचणीत करोनाबाधित आढळले असून दोन दिवसांपूर्वी दोघे आधीच बाधित झालेले आहेत. या माहितीला कारागृह प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नाही. मात्र, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून १४ कैदी करोनाबाधित आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.

सिल्लोड, गंगापूर आदी भागातील काही कैद्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन आदेशानंतर त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. या कैद्यांचे तापमान चाचणी घेत असताना त्यांच्यामध्ये सौम्य प्रकारची करोनाची लक्षणे आढळून आली.

या कैद्यांना तातडीने कारागृहातच विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विलगीकरणातील कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू असून इतर कैद्यांबाबतही काळजी घेण्यात येत आहे. यासाठी हर्सूल कारागृहाचे व महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

हर्सूल कारागृहात मराठवाडय़ासह इतरही भागातील मिळून दीड हजारांवर बॉम्बस्फोट प्रकरणासह विविध गुन्ह्य़ातील कैदी असून त्यातील एक हजारांपेक्षा अधिक कैद्यांची नियमित तपासणीत करोनाचीही चाचणी करण्यात आलेली आहे. दोन दिवसांपूर्वी कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या दोन कैद्यांना करोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर रविवारच्या तपासणीत १२ कैद्यांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे तापमान तपासणीच्या यंत्रामध्ये आढळून आली. तातडीने त्यांच्यासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष कारागृहातच तयार करण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत.