औरंगाबादेत मध्यरात्री घडल्या खूनाच्या दोन घटना, एका तरुणासह महिलेच्या हत्येनं परिसरात खळबळ

रविवारी मध्यरात्री औरंगाबाद शहरात हत्येच्या दोन घटना घडल्या आहेत.

murder case
(संग्रहित छायाचित्र)

रविवारी मध्यरात्री औरंगाबाद शहरात हत्येच्या दोन घटना घडल्या आहेत. बायजीपुरा रोडवर किरकोळ वादातून एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत भाजीविक्रेत्या महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला आहे. एकाच रात्रीत हत्येच्या दोन घटना घडल्यानं औरंगाबादेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

बायजीपुरा रोडवर एका तरुणाने आपल्या मित्राचा चाकूचे वार करून खून केला आहे. तर बाळापूर शिवारात एका भाजीविक्रेत्या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या दोन्ही घटना रविवारी रात्री घडल्या असल्याची माहिती जिन्सी व चिकलठाणा पोलिसांकडून देण्यात आली.

बायजीपुरा भागात खून झालेल्या तरुणाचं नाव शाहरुख अन्वर शेख (१८, रा. इंदिरानगर, गल्ली क्र. ३०) असं आहे. मित्राने हल्ला केल्यानंतर मृत शाहरूख रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. यावेळी त्याने अनेकांकडे मदतीसाठी याचना केली. मात्र, त्याच्या मदतीला कुणीही आलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर त्याला भोकसणारा तरुण हैदर खान उर्फ शारेख जाफर खान (रा. संजय नगर, गल्ली क्र. ११) हा देखील जखमी झाला आहे. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती देताना जिन्सी पोलिसांनी सांगितलं की, घटनेच्या दिवशी मृत शाहरुख आणि त्याचा मित्र हैदर हे दोघंही रात्रीच्या सुमारास बायजीपुरा परिसरातील सिकंदर हॉल समोर बसले होते. दोघांनीही नशा केली होती. दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपी हैदरने स्वत: जवळील धारदार चाकू काढून शाहरुखच्या कमरेवर, पायावर, बरगडीत सपासप वार केले. मृत व आरोपी तरुण हे दोघंही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

३५ वर्षीय महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
औरंगाबादेतील टिबी इस्टेट परिसरात पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव सुशीला असून त्या दहा वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत होत्या. त्या मुकुंदवाडी भागातील आंबिकानगर परिसरात आपल्या तीन अपत्यांसह राहत होत्या. त्यांना २२ वर्षांचा मुलगा आणि दोन मुली आहेत. त्या भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या.

सोमवारी सकाळी सातच्या सुमारास बीडबायपास रोडवरील बाळापूर शिवारातील टीबी इस्टेट येथे सुशीला यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक देविदास गात यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2 murder incident in aurangabad on sunday night man killed friend attack with knife woman found dead crime in aurangabad rmm

Next Story
जायकवाडीतील बाष्पीभवनाचा पाच वर्षांतील जोर अधिकच; मात्र या वर्षीच्या उन्हाळय़ात गतवर्षीपेक्षा कमी बाष्पीभवन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी