आंध्र प्रदेशातील काही ठेकेदारांनी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात बोगस कामे केल्याच्या तक्रारी आहेत. सुमारे २०० कोटींच्या या कामांची वीज वितरण कंपनीच्या गुणनियंत्रण विभाग तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीअंती ज्या कामांमध्ये दर्जा राखला गेलेला नसेल, अशी सर्व कामे संबंधितांकडून पुन्हा करून घ्या, असे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आढावा बठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना बजावले.
जे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहात नसतील त्यांचे घरभाडे तातडीने बंद करा. त्यानंतरही तो मुख्यालयी न आल्यास तीन महिन्यात निलंबन आणि त्यानंतरही योग्य कार्यवाही न झाल्यास पुढील तीन महिन्यात त्याची सेवा खंडित करा, असे निर्देशही  बावनकुळे यांनी दिले.
उस्मानाबाद जिल्ह्यात घरगुती, व्यापारी तसेच इतर प्रकारच्या दोन हजार ग्राहकांना वीज जोडणी देण्याचे काम प्रलंबित आहे. याबाबत कुठल्याही परिस्थितीत एक महिन्यात कार्यवाही पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांसह अन्य संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.  जिल्ह्यात ७ हजार १५० कृषी पंपांची जोडणी देणे बाकी आहे. शेतकरी कृषी पंपासाठी हेलपाटे मारत असताना कार्यालयात बसून तुम्ही काय करता, असा सवाल करीत मार्च २०१६ पर्यंत ही मागणी पूर्ण होईल. शेतकऱ्यांकडून नवीन रोहित्र तसेच वीजजोडणीसाठी अर्ज केल्यानंतर त्याच्याकडून वाहतूक तसेच इतर बाबींसाठी खर्च मागितला जातो. वस्तुत: टेंडरमध्येच या सर्व खर्चाची तरतूद असताना असा प्रकार घडतोच कसा, असे विचारत यापुढे कोणाकडूनही पसे न घेता काम करण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
चार जणांनी वीज ठेवली शाबुत
आढावा बैठकीदरम्यान शनिवारी रात्री वीज जाऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. या कर्मचाऱ्यांनी बठकीबाहेरच्या रोहित्राखाली आपली शक्कल लढवित तीन मोठे दिवे लावले होते. कोणताही फेज गेला तर ते लगेच कळावे यासाठी ही व्यवस्था होती. बठक रात्री होती. मात्र सकाळपासूनच या कर्मचाऱ्यांना हे एकमेव काम होते. बठक रात्री उशिरा संपली. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी या बठकीत महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची अक्षरश: हजेरी घेतली. या बठकीत लोकांच्या इतक्या तक्रारी होत्या की महावितरणचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा बावनकुळे यांच्या संतापाने भांबावून गेले होते.