छत्रपती संभाजीनगर – विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने घेण्यात येणारे २० वे साहित्य संमेलन यंदा नांदेड येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, लेखक, अनुवादक लोकनाथ यशवंत (नागपूर) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी येथे दिली.

नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज मैदानावर होणाऱ्या संमेलनात यवतमाळ येथील १९ व्या विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. अशोक राणा यांच्याकडून कवी लोकनाथ यशवंत हे सूत्रे हाती घेतील. अखिल भारतीय संमेलनासाठी सरकारकडून देण्यात येणाऱ्या कोटींच्या निधीतून सभामंडप वातानुकूलित करण्यासारखा खर्च करण्यात येत असून, हा एक प्रकारचा माज आहे. केवळ जेवणावळी उठवल्या जातात आणि येणाऱ्यांची बडदास्त ठेवण्यातच अधिक खर्च होतो. त्यामुळे सरकारने हा निधी तत्काळ बंद करावा व त्यातून शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, अशी भूमिकाही प्रा. परदेशी यांनी यावेळी मांडली. विद्रोही संमेलन हे लोकवर्गणीतून आयोजित केले जाते, असे सांगत परदेशी यांनी प्रत्येक विद्रोही संमेलन हे अखिल भारतीय संमेलनाच्या ठिकाणीच व्हावे, असे काही ठरलेले नाही, असेही स्पष्ट केले.

विद्रोही चळवळीच्या वतीने १९९९ पासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी १९ साहित्य संमेलने तसेच १ आंतरराज्य (निपाणी) व १ विद्रोही स्त्री साहित्य संमेलन, पुणे यशस्वीपणे आयोजित करण्यात आले आहेत, असे प्रा. परदेशी म्हणाल्या. विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले कवी लोकनाथ यशवंत हे समकालीन मराठी कवितेतील महत्त्वाचे नाव असून ‘आता होऊन जाऊ द्या !’, ‘आणि शेवटी काय झाले?’, ‘पुन्हा चाल करू या…’, ‘बाकी सर्व ठीक आहे…’, ‘हे तर होणार होते हे’ त्यांचे ५ कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये ४ अनुवाद ‘ऐलान’, ‘आखिर क्या हुआ’, Broken Man, The Downtrodden या नावाने प्रकाशित झाले आहेत.

त्यांच्या कवितांवर ४ नाट्यरूपांतरे – एकपात्री प्रयोग, एकांकिका, नाट्यप्रयोग झाले आहेत. त्यांच्या शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमी वरील “बैल” या कवितेवर ‘बाईस्कोप’ हा मराठी चित्रपट साकारण्यात आला आहे. लोकनाथ यशवंत यांनी स्वतः ४ अनुवाद मन्सूर एजाज जोश, निदा फाजली यांच्या कविता आणि सहादत हसन मंटो यांच्या लघुकथांचे हिंदीतून मराठीत अनुवाद केले आहेत. तर बाबुराव बागुल यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद देखील त्यांनी केला आहे. त्यांच्या निवडक कवितांचे दोन संग्रह “आता आणि पुन्हा…” (संपा. इसादास भडके) ”   यशवंत कविता लोकनाथची” ( सं.मेघमाला मेश्राम) प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या कविता विविध राज्यातील शिक्षणक्रमात समाविष्ट असून त्यावर विद्यापीठांमध्ये शोधप्रबंधही प्रसिद्ध झाले आहेत.  नांदेड विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल एस एम प्रधान हे आहेत. या पत्रकार परिषदेला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, प्रा. भारत शिरसाठ आदी राज्य पदाधिकारी उपस्थित होते.