तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील पाणलोट समितीचे अध्यक्ष, सचिव व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी संगनमताने कृषी विभागाच्या बँक खात्यातून जवळपास ३९ लाख रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणाची चौकशी करून ही रक्कम हडप करणाऱ्या पाणलोट समितीच्या अध्यक्ष, सचिव व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश पुणे येथील कृषी आयुक्तांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना दिले आहेत. अपहारित रक्कम वसूल करण्याबाबत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्याकडे तक्रारकत्रे शाहूराज देशपांडे यांनी मागणी केली होती.

शाहूराज देशपांडे यांच्या तक्रारी अर्जानुसार वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे पुणे येथील कृषी आयुक्तांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करून याबाबतचा अहवाल मागविला आहे. खडकी येथील पाणलोट समितीस सक्षम यंत्रणेची परवानगी न घेता संगनमताने अंदाजे ३९ लाख रुपये बेकायदेशीर उचलले आहेत. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक हे देखील जबाबदार आहेत. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यांनी ठेकेदारास रोखीने रक्कम अदा केली असून अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. पाणलोट समिती सचिवांच्या नियुक्त्या नियमानुसार झालेल्या नाहीत. पाणलोट समिती व कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांनी पाणलोट समितीच्या खात्यातील रकमा बेकायदेशीररीत्या उचलल्या आहेत. त्यामुळे दोषींवर कार्यवाही करुन वसूलपात्र रकमेची वसुली करावी, या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करावेत, तक्रारी अर्जाची मुद्देनिहाय तत्काळ चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कारवाई करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे नमूद करण्यात आले आहे. खडकी येथील पाणलोटच्या अपहाराची चौकशी करावी, या मागणीसाठी शाहूराज देशपांडे यांनी वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून चौकशी होऊन येथील पाणलोट समितीचे अध्यक्ष, सचिव कृषी कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याने या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.