5 Lakh Single Women in Marathwada : पूर्णा तालुक्यातील अनिता जाधव यांचे पती करोनामध्ये वारले. ती घटना विसरायची म्हटले तरी त्यांना शक्य नाही. पदरी दोन मुले. आता मुलगी सहावी शिकते आहे आणि मुलगा १२ वीमध्ये. पती शेतमजूर होते. ते गेले आणि अनिताबाईंसमोर संकटाची मालिकाच उभी राहिली. दुसऱ्याच्या शेतात मजुरीने जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नाही. पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर नावाच्या गावाला ‘एसटी’ बस जात नाही. शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी ऑटो रिक्षाने दररोज पुर्णा या तालुक्याच्या ठिकाणी जायचे.
अनिताबाईचा १२ वीत शिकणाऱ्या मुलास किमान पुर्णापर्यंत जाण्यासाठी दररोज ५० रुपये लागतात. अनिताबाई दररोज कधी २५० कधी ३०० रुपयावर जेे मिळेल ते शेतात काम करतात. अनिताबाईचा मुलगा पूर्णा या तालुक्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये नोकर म्हणून काम करतो. महाविद्यालयात शिकतो आणि पुन्हा गावी येतो. मुलगी गावातील शाळेत जाते. दुसरा मुलगा आईला किती पैसे मागायचे म्हणून शहरात काम करतो. तो आता ‘एसी’ दुरुस्तीचं काम शिकू लागला आहे. तो काही अनिताबाईंना पैसे मागत नाही. अशा हालाखीच्या परिस्थितीमधील अनिताबाईच्या सासूला कर्करोग झाला. त्यांना छत्रपती संभाजीनगरला उपचारासाठी आणले. शक्य तेवढा पैसा उधार घेतला. उपचार केले. अनिताबाईंना निराधार योजनेचे १५०० रुपये मिळतात. त्यामुळे लाडक्या बहिणीचे अनुदान त्यांना लागू झाले नाही. आता मुलगा शिकावा मोठा व्हावा म्हणून त्या त्यांची साडे तीन हजार रुपयांचे शैक्षणिक शुल्क भरतात. त्याने ‘क्राॅप सायन्स’ असा विषय घेतला म्हणून त्याला अधिक पैसे लागले. हा सारा संसाराचा पसारा फक्त शेतमजुरीवर.
अनिता जाधव हे केवळ उदाहरण. कोणाचा तरी नवरा अपघातामध्ये वारला. एखाद्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. दारुच्या व्यसनामुळे एखाद्याचा मृत्यू झालेला त्यातून आलेले वैधव्य एका बाजूला. तर काहींना नवऱ्याने सोडून दिलेली. तर कोणी घटस्फोटीत. मराठवाड्यात अशा एकल महिलांची संख्या आहे चार लाख ९३ हजार ३२० एवढी. प्रत्येकीची वेगळी कहाणी जगण्याचा संघर्ष निराळा. पण बहुतेकजणींचा सध्या जगण्यासाठी कमावण्याचा मार्ग शेतमजुरी. मराठवाड्यात शेती प्रश्नामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या १० हजारांहून अधिक आहे.
जयश्री थोरात या आता ५३ वर्षाच्या आहेत. केज तालुक्यातील नायगावमध्ये राहतात. पाच मुली आणि एक मुलगा. भावाच्या गावी ऑटो रिक्षाने जाताना एक अपघात झाला आणि अनंता थोरात यांचे निधन झाले. तत्पुर्वी चार मुलींचे लग्न झाले होते. आता एक मुलगी लग्नाची आणि लहान मुलगा आठवीमध्ये शिकतो आहे. खरे तर आता त्यांना शेतीचे काम होत नाही. पण इलाज नाही. मजूर म्हणून राबले नाही तर घर भागणार नाही. पल्लवी आता ११ मध्ये आहे. दोन मुलांना शिकवायचे, पोसायचे म्हणून त्या राबतात. जगण्याची भ्रांत असणाऱ्या बहुतेक महिलांना १५०० रुपये वेगवेगळया योजनेतून मिळतात. त्यामुळे तो ‘ पगार ’ कधी होतो यावर अनेक नजरा. गावपातळीवर यातील काही हुशार महिलांनी शिकलेले कौशल्य म्हणजे शिवणकाम. बीड जिल्ह्यात उसतोडणी हाही एक पर्याय. मराठीत ‘कोंड्याचा मांडा’ अशी एक म्हण अशा महिलांच्या कष्टाच्या जगण्यातून आली असावी. संसाराची ही कसरत करणाऱ्यांची संख्या पहिल्यांदा समोर आली आहे.
चार लाख ९३ हजार महिलांपैकी १४ हजार ४६३ महिला घटस्फोटीत. २३ हजार ७२६ जणी परितक्त्या. हे सारे अशा भागात जिथे बालविवाहाची टक्केवारी ५२ टक्के एवढी आहे. लहान वयात लग्न होण्याचे प्रमाण अधिक असल्याने तरुण वयात म्हणजे १८ ते ३० वयोगटातील एकल महिलांचे प्रमाण ३२ हजार ९६६. या महिलांच्या समस्या पुन्हा निराळ्या. गावात एकट्याने राहताना आधार शोधणाऱ्या या महिलाच्या सुरक्षेचे प्रश्न अधिक किचकट. खरे ग्रामीण भागात होणारी बाईपणाच्या वर्गवारीचे निकषच अधिक. एकल महिलांमध्ये मुले असलेली, निपुत्रिक, नवऱ्याने सोडून दिलेली, नाना कारणाने आधार हरवलेल्या या महिलांची पहिल्यांदाच शासकीय स्तरावर गणना झाली. पुढाकार घेतला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी. सामाजिक कामात पुढाकार घेणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांनी हे काम हाती घ्यावे यासाठी पाठपुरावा केला. अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्या मदतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामुळे एक नवे दालन धोरणात्मक निर्णय घेतानाही उपयोगी पडू शकेल असे मानले जाते.
या महिलांच्या समस्या आणि मानसिकता याची गुंतागुंत किती ? गेली अनेक वर्षे एकल महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या मंगल खिवंसरा सांगत होत्या, ‘तुळजापूर तालुक्यातील अणदूरमध्ये हॅलो मेडिकल फाऊडेशनच्या एका कार्यक्रमात एकल महिलांचा मेळावा होता. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या महिलांनी डोक्यात गजरा माळावा असे त्यांना सांगण्यात आले. पण कोणी पुढाकार घेईना. प्रत्येक महिलेच्या मागे बसणाऱ्या महिलेस गजरा माळण्याची जबाबदारी देण्यात आली. आणि नंतर विचारण्यात आले गजरा माळल्यावर काय वाटले ते सांगा ? – काही जणी मनोगतामध्ये फक्त रडत होत्या. ’गजरा घातला तर लोक काय म्हणतील अशी भीती ज्यांच्या मनात असते त्यांना स्वतंत्र विचार करायला शिकवायचे, मजुरी करुन का असेना पण मुलांना शिकविण्यासाठी धडपड करायची. पदरी मुलगी असेल तर लग्न लावून देण्याची काळजी निराळीच.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एकल महिलांच्या मुलांची संख्या ४४ हजार ७२१ एवढी आहे. अशा भावविश्वातील महिलांची एवढी मोठी संख्या मराठवाड्यात आहे, हे कळाल्यानंतर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शासकीय यंत्रणेमध्ये गांगरलेपण येईल, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण किमान काही योजनांमध्ये या महिलांना लाभार्थी बनवता येईल का, याची चाचपणी होणे हेही काही कमी नाही. अशा निराधार महिला बचत गटामध्ये आहेत का, हेही आता तपासण्यास सांगण्यात आले आहे. अशा महिलांना संंजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ याेजनेतून लाभ मिळतो. या महिलांच्या आरोग्याचे प्रश्नही मोठे आहेत. त्यासाठी एखादी व्यवस्था उभी करता येईल का, याचाही विचार करावा असे सुचविण्यात आले आहे.
किमान शासकीय योजनांचा आढावा घेताना अशा निराधार महिलांचा प्राधान्याने विचार करावा असे निकषात म्हटले तरी बरेच प्रश्न सुटू शकतील. गावगाड्यात एकटीने राहणे हे एक आव्हानच असते. घरातील कर्ता सोडून गेलेला असल्याने त्यांच्या नावावर असणाऱ्या एकर दोन एकर शेतावर दीर दावा सांगत असतो. सासू अचानक दीराच्या बाजूने उभी राहते. त्यामुळे एका बाजूला साथीदार नसल्याचे दु:ख घेऊन लढणाऱ्या या महिलांचे घरातील आधारही तसे तुटलेले असतात. एकलपणातून आलेले बुजरेपण आणि परंपरेने डोईवरचा पदर ढळू न देता धाडसाने पुढे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसणाऱ्या या महिलांना खरोखर मदत मिळण्याचे एक दार किलेकिले झाले आहे.
