शहराची सुरक्षा लक्षात घेऊन शहरात ३० ठिकाणी ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. कोणत्याही बडय़ा व्यक्तीची वाट न पाहता पोलीस आयुक्तांनी कॅमेरे सुरू केले. पुढील वर्षांत नव्याने २५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी जिल्हा वार्षकि आरखडय़ात देण्यात येणार आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी पत्रकार बठकीत सांगितले. गेल्या वर्षी ३८७ कुटुंबातील ताण कमी करून पोलिसांच्या समुपदेशामुळे लग्न वाचले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
पोलीस दलात नवीन तंत्रज्ञान स्वीकारत जीपीएस प्रणाली बसविली आहे. १२ गाडय़ांवर बसविण्यात आलेल्या प्रणालीमुळे अधिकारी किती वेळात गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोहचू शकेल, हे समजणार आहे. तीन महिन्यापर्यंतची माहिती या जीपीएस प्रणालीत पाहता येते. त्यामुळे पोलिसांची गस्त कशी झाली, हे वरिष्ठांना समजणार आहे.
शहरातील विविध गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलाकडून सुरू असणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, पोलीस मित्रांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या ही संख्या १४९८ एवढी आहे. येत्या वर्षांत ती ३ हजारापर्यंत जावी, असे वाटते. शहरातील पोलीस ठाण्यांचे काम संगणकीकृत करण्याचे ठरविले आहे. येत्या वर्षांत पोलीस दलाचे काम पेपरलेस व्हावे, असा संकल्प केल्याचेही त्यांनी सांगितले.
१९९० पासून पोलीस आवारात पडून असलेल्या वाहनांच्या लिलावातून १९ लाख रुपये मिळाल्याचेही या वेळी सांगण्यात आले. या वाहनांमुळे पोलीस ठाण्यांत अडगळ वाढली होती. येत्या काळात पोलिसांची गस्त अधिक शिस्तबध्द करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत ३ प्रकरणात कारवाई करण्यात आली तर शहरातील पाच टोळ्यांवर नियंत्रण मिळविल्याचा दावाही त्यांनी केला.
येत्या काळात ज्यांच्याकडे नोकर आहेत अशांची माहिती ऑनलाईन भरता येईल, अशी व्यवस्थाही पोलीस दलाकडून केली जाणार आहे. चारित्र्य प्रमाणपत्र ऑनलाईन करण्यावरही भर असेल, असेही अमितेशकुमार म्हणाले.