शहर स्वच्छतेसाठी कचरा रस्त्यावर टाकू नका, कचराकुंडीतच टाका. असे फलक प्रत्येक शहरात पाहायला मिळतात. मात्र औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे. ‘कुंडीत कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल’ अशी आदेशवजा सूचना पालिकेकडून देण्यात आली असून तसा फलकच कचराकुंडीवर लावण्यात आला आहे. शहरातील सिडको परिसरातील कचराकुंडीवर हा बोर्ड लावण्यात आला आहे. एवढंच नाही तर कोणी कचरा टाकू नये यासाठी पालिकेकडून कचराकुंडीला पहारेकरी ठेवण्यात आला आहे. दिवसरात्र हा पहारा देण्यात येत आहे.

शहरातील सिडको भागातील एन-२ च्या मैदानाबाहेर पालिकेची कचराकुंडी आहे. रस्त्यावर असलेल्या या कुंडीत परिसरातील नागरिक कचरा टाकतात. मात्र गेल्या १३ दिवसांपासून कुंडीतला कचरा उचलला नसल्याने काठोकाठ भरली असून त्यातून दुर्गंधी यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पालिकेकडून त्यामध्ये कचरा टाकण्यास मनाई केली आहे. त्यासाठी कुंडीवर आर्थिक दंडाची सूचना लावली आहे. सूचना वाचूनही नागरिक कचरा टाकतील म्हणून सुरक्षारक्षक देखील ठेवण्यात आला आहे. दिवसरात्र पहारा दिला जात असल्याचे सफाई कामगार असलेल्या मालनबाई जाधव यांनी सांगितलं. बचत गटाच्या माध्यमातून त्या पालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. नारेगाव परिसरातील नागरिकांनी कचरडेपोवर कचरा टाकण्यास विरोध केल्यापासून कचऱ्याची राखण करण्याची ड्युटी लागल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या वेळी जास्त प्रमाणात नागरिक कचरा टाकायला येतात. सुरुवातीला पुरुष कर्मचारी पहारा द्यायचे. मात्र भांडणे होऊ लागल्याने सकाळी आपल्याला राखणीला बोलवल्याचे त्यांनी सांगितले. दिवसाही आणि रात्री देखील कर्मचारी पहारा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शहराच्या कचराकोंडीचे प्रकरण न्यायालयात गेले असून मूलभूत सुविधा देण्यास पालिका अपयशी ठरत असल्याने पालिकेला न्यायालयाने फटकारले. नारेगाव इथे कचरा न टाकता पर्यायी जागेचा शोध घेण्याचा सूचना केल्या आहेत. त्यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी पाहणी केली. त्याठिकाणी त्यांना स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. कचराप्रश्नावर स्थगित करण्यात आलेली सुनावणी आज होणार आहे. नेमका काय तोडगा निघणार याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागले आहे.