|| सुहास सरदेशमुख

५५ गतिमंद मुली करोनामुक्त

औरंगाबाद : दररोज १०८ मुलींचे तापमान मोजायचे, प्राणवायूची पातळी कमी होत नाही ना, हे तपासायचे. मुलांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांची दर १५ दिवसांनी प्रतिजन चाचणी करायची… एवढी काळजी घेतल्यानंतरही ५५ अनाथ आणि गतिमंद मुलींना करोना संसर्ग झाला आणि स्वाधार मुलींच्या अनाथाश्रमातील सारे हैराण झाले.

संसर्ग झालेल्या मुलांची संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या मुलांसाठी आश्रमातच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. या प्रकल्पातील कार्यकत्र्यांनी फळे, अंडी यासह प्रत्येक मुलाची अधिक काळजी घ्यायला सुरुवात केली आणि आता संसर्गातील १४ दिवसांचा कठीण काळ गुरुवारी संपला आणि सर्वांना आनंद झाला.

संस्थेचे प्रमुख शहाजी चव्हाण म्हणाले, ‘‘काळ कठीण आहे. पण संकटावर मात करता येते.’’ बहुविकलांग मुली करोनातून बाहेर पडत असल्याने प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात मुलांच्या काळजीसाठी स्वतंत्र कार्यबल गट स्थापन केले जात आहेत. राज्यात गतिमंद मुलांचे ११ बालकाश्रम असून त्यात १४१० अनाथ आणि गतिमंद मुले आहेत.

करोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सीमीटरची खरेदी, थर्मामीटरने तापमानाची मोजणी आवश्यक असल्याचे लक्षात आल्यानंतर आश्रमातील प्रत्येकाला प्रतिजन चाचणी करण्यास कर्मचाऱ्यांना तयार करणे हे आव्हान होते. कोणतीही लक्षणे नसताना चाचणी करून घेण्याची अट टाकल्यानंतर कर्मचारी हैराण झाले. गेले वर्षभर अर्धे कर्मचारी १५ दिवस मुलांसह वसतिगृहात राहात. पण खूप काळजी घेतल्यानंतरही करोना संसर्ग झालाच.

पहिल्या टप्प्यात ३२ मुली बाधित झाल्या. त्या दिवशी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट दिली. आश्रमस्थळीच डॉक्टरांची आणि परिचारिकांची नेमणूक केली. दररोज अंडी, नारळपाणी, असा पोषक आहार आणि औषधोपचारांच्या आधारे आता सर्व मुली करोना संसर्गातून बऱ्या झाल्या आहेत. पुढील काही महिने अजूनही या मुलींची काळजी घेण्याची गरज आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठीचे कार्यबल गट तयार होऊ लागले आहेत. मुलांची रुग्णालये उभी करण्याची तयारीही सुरू झाली आहे. औरंगाबाद शहरात आता महापालिकेकडून १०० खाटा आणि गरवारे कंपनीच्या वतीने १०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. तिसरी लाट आलीच तर मुलांसाठी रुग्णालयात अतिदक्षता खाटांचीही गरज लक्षात घेऊन तयारी सुरू झाली आहे. भविष्यात विशेष मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

एचआयव्ही संसर्ग असणारी, बालसुधारगृहातील मुले यांची काळजी घेण्याची गरज आहे. वाढत्या संसर्गामुळे ती पुन्हा अधोरेखित झाली आहे. बहुविकलांग आणि गतिमंद मुलांच्या संरक्षणाचे काम आहे. परिस्थिती हाताबाहेर जाते की काय असे वाटत होते, परंतु जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे यांच्यामुळे सुविधा नीट मिळत गेल्या आणि मुलांवरील एक संकट तूर्त टळले आहे. यापुढे मुलांची अधिक काळजी घेतली जाईल. – शहाजी चव्हाण, स्वाधार मतिमंद  मुलींचे बालगृह