औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने एटीएम लुटण्याचे प्रकार समोर येत आहे. शनिवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास कारमधून आलेल्या चोरट्यांनी पडेगावमधील छावणी परिसरातील एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. एटीएममधील हालचाली बाहेर दिसू नये याकरिता दोन चोरट्यांनी एटीएमच्या रस्त्याकडील बाजूने चादर लावली. चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने मशीन कापण्यास सुरूवात केली. त्यावेळी आलेल्या आवजामुळे जवळच राहणाऱ्या ७३ वर्षीय आजोबांना जाग आली.

आजोबांनी प्रसंगावधान राखत या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना आणि एटीएमच्या शेजारी असणाऱ्या किराणा दुकानदाराला कळवले. दुकानातील कामगारांनी आणि आजोबांनी चोरट्यांच्या वाहनावर दगडफेक केली. त्याचदरम्यान पकडण्याच्या भीतीपोटी चोरट्यांनीही उलट लगडफेक सुरू केली. चोरट्यांनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. चोरांनी केलेल्या दगडफेकीत वृद्ध जखमी झाले. सतर्क असलेल्या ७३ वर्षीय वृद्धामुळे एटीएमची चोरी वाचली. या एटीएममध्ये २५ लाख रूपयांची रोकड होती.

दरम्यान, शुक्रवारी औरंगाबादमध्ये एटीएम मशीन घेऊनच चोरांनी पोबारा केल्याची घटना घडली होती. या मशीनमध्ये २२ लाख ७७ हजार रुपये होते. गेल्या दोन वर्षांत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ११ एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे.