औरंगाबाद : दहा लाखांच्या बदल्यात चौपट, चाळीस लाखांच्या बनावट चलनातील नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आठ जणांची टोळी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. किशोर ऊर्फ ईश्वर रामदास फतपुरे, प्रकाश ऊर्फ अण्णा लक्ष्मण शिंदे, दिलीप दगडु मंजुळकर, बाबासाहेब आबाराव आवारे, अरुण तुकाराम घुसळे, किशोर गोरख जाधव, भैय्यालाल बारीकराव शिकरूपे व सत्यपाल चंद ढोले अशी आरोपींची नावे आहेत. यातील काही खुलताबाद तालुक्यातील तर काही वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रहिवासी आहेत.

या प्रकरणी औरंगाबादमधील रोशनगेट परिसरातील रहिवासी तथा खरेदी विक्रीतील व्यावसायिक रहिवासी मोहंमद अलियोद्दीन अहमद सादीक अली (वय ४५) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार त्यांची किशोर फतफुरे व दिलीप मंजुळकर यांच्यासोबत एका जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून ओळख झाली होती. त्यातूनच किशोर फतफुरे याने मोहंमद अली यांना चलनात येण्यासारख्या बनावट चलनी नोटा असल्याचे सांगितले.

या नोटा बँकेतही चालतात. त्या बदल्यात दहा लाख रुपये दिले तर चाळीस लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळवून देतो, असेही सांगितले. मात्र, अली यांनी सुरुवातीला नकार दिला. परंतु वारंवार तगादा लावल्यामुळे त्यांनी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी खुलताबादेत एका हॉटेलजवळ सापळा रचून आठही जणांना पकडले. पोलिसांनी ५०० रुपयांच्या काही बनावट नोंटासह एकूण ७ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.