छत्रपती संभाजीनगर: वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील वडगाव कोल्हाटी येथील साईबाबानगर येथे तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ही घटना कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलांना मृतदेह आढळून आल्यानंतर उघडकीस आली. कपिल पिंगळे असे या तरुणाचे नाव असून तो हॉटेलचालक असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच सुनील काळे यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी सहाय्यक फौजदार विकास वैष्णव, विशेष शाखेचे योगेश शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी पिस्टल आढळून आले. मारेकऱ्यांनी पिस्टल तेथेच सोडून पळ काढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुसं जप्त केले आहेत. मृत कपिल पिंगळे यांचे वाळूज औद्योगिक वसाहतीत सीएट कंपनीजवळ माऊली नावाचे हॉटेल आहे.