छत्रपती संभाजीनगर : मस्साजोग येथील जिवाची वाडी येथे सुरू असलेल्या पवजउर्जा प्रकल्पाचे काम शेतकऱ्याने अडवून धरत ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली तसेच दोन मुलांना कायमस्वरुपी नोकरी द्यावी, अशी अट टाकली. सुरू असणारे काम बंद पाडले, अशी तक्रार अवादा कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून नोकरी करणारे विशाल जयप्रकाश शेलार यांनी केज पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रभू नारायण सारूक, प्रमिला प्रभू सारूक, मच्छिंद्र प्रभाकर सारूक या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकल्पातून खंडणी मिळावी यासाठी वाल्मिक कराड याने पूर्वी गुंड पाठवले होते. पुढे यातूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती.
अवादा कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्प उभारणीसाठी ३ नोव्हेंबर रोजी दत्ता टिंगरे, अक्षय टेकाळे, नितीन कांबळे हे कर्मचारी जेसीबी यंत्रासह काम करण्यासाठी गेले असता शेतीचे मालक प्रभू नारायण सारूक आणि पत्नी प्रमिला यांनी काम अडवले. ३० लाख रुपये आणि आमच्या दोन मुलांना कंपनीमध्ये काम द्या, अशी अट टाकली. वास्तविक या शेतीमध्ये काम करण्यासाठी सारूक यांना पूर्वीच मोबदला देण्यात आला असल्याची आठवण या कर्मचाऱ्यांनी करून दिली. पण कर्मचाऱ्यांचे म्हणणे न ऐकता सारूक पती -पत्नी यांनी काम बंद पाडले.
या कंपनीमध्ये सध्या सारूक यांचा मुलगा मच्छिंद्र सारूक सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे. तोच आई वडिलांना काम होऊ देऊ नका, ते काम अडवून धरा, असे वारंवार दूरध्वनीकरून सांगत होता. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शेतमालकानेच खंडणीची पुन्हा मागणी केल्याने केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवादा कंपनीस खंडणी मागण्याच्या संबंध मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी असल्याचा दावा विशेष तपास पथकाने न्यायालयात केला आहे. यातील खंडणीसाठी धमकी प्रकरणात वाल्मिक कराड याचा हात होता. आणि खंडणीला विरोध करणारे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या आरोपाखाली वाल्मिक कराड यास अटक करण्यात आली. आजही त्याला जामीन नसल्याने तो कारागृहात आहे. आरोपी कराड आणि तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध असल्याने मुंडे यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उभे ठाकले. पुढे या प्रकरणातून त्यांना मंत्रीपदाचा त्याग करावा लागला होता. आता पुन्हा एकदा ज्याच्या शेतात पवनउर्जा उभारणीचे काम सुरू आहे, त्या शेतकऱ्यानेच खंडणी मागितल्याचा आरोप कंपनी व्यवस्थापनाने केला आहे.
