हिंगोली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काला केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळणे आवश्यक आहे. मात्र, जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधांची दुरवस्था पाहता ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या गैरसोयी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे गुन्हा असेल, तर एक नाही, शंभर गुन्हे दाखल करा; पण शाळा सुधारुन विद्यार्थ्यांना सुविधा द्या, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शनिवारी (ता. २९) शासनाला दिला.

हिंगोली तालुक्यातील लोहगाव आणि करंजाळा येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन दिपके यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वर्गखोल्या, विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी तसेच मध्यान्ह भोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांची त्यांनी पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी शाळेतील विविध समस्यांचा पाढाच दिपके यांच्यासमोर वाचला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता असतानाही त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळत नसतील, तर ही केवळ शाळांची समस्या नसून शिक्षणातील सामाजिक विषमतेचा गंभीर प्रश्न आहे, असे दिपके यांनी सांगितले. एका बाजूला अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची मुले अत्याधुनिक सुविधांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात, तर दुसरीकडे सर्वसामान्यांची मुले मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या, अपुरी आसनव्यवस्था आणि मूलभूत सुविधांच्या अभावात शिक्षण घेत आहेत, ही परिस्थिती दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.

शाळांची पाहणी केल्यामुळे गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईबाबत बोलताना, “विद्यार्थ्यांच्या अडचणी दाखवून देणे हा गुन्हा असेल तर एक नाही, शंभर गुन्हे दाखल करा; मात्र शाळा नीट करा,” असे दिपके यांनी स्पष्ट केले. आदिवासी विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. मुंबई-पुण्यातील खासगी शाळांच्या धर्तीवर ग्रामीण जिल्हा परिषद शाळांमध्येही आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

लोहगाव शाळेतील पाण्याच्या टाकीवर चढून पाहणी

लोहगाव शाळेत पिण्याच्या पाण्याची पाहणी करताना ग्रामस्थांनी, दिपके भेट देणार असल्यानेच जारचे शुद्ध पाणी आणण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर दिपके यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून पाहणी केली. टाकीतून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले.