छत्रपती संभाजीनगर : जंतरमंतरवरील आंदोलन हे देशातील तरुणांचे आंदोलन होते. मात्र, आंदोलनातील अंतर्गत निर्णय प्रक्रियेतही लोकशाही असायला हवी. पण तसे होताना दिसत नाही. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके निर्णयक बैठकांना सर्व राज्यातील आंदोलकांशी संवाद साधायला तयार नाहीत, असा आरोप मनिष ब्रम्हभट यांनी केला. गुजरातच्या अहमदाबादहून आलेल्या ब्रम्हभट यांनी, ‘ पक्षातील अंतर्गत शिस्त ठेवण्याऐवजी घरातील काही भावांना आणि मित्र परिवारातील काही मोजक्याच मंडळींना बरोबर घेऊन निर्णय घेतले जात आहे.’ असा आरोप केला. हे म्हणणे माध्यमांपर्यंत पोहचावे म्हणून ब्रम्हभट आणि त्याच्या सहकाऱ्याने रस्त्यातच बसकण मारली.
मनिष ब्रम्हभट व त्यांच्या सहकाऱ्याने बुधवारी रात्रीपासून अभिजीत दिपके आणि त्याचे साथीदार आशितोष रांका यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दूरध्वनीवरुन काही संदेशाची देवाणघेवाणही झाली. पण त्यांना बैठकीत बसू दिले गेले नाही. ही बैठक केवळ प्रवक्त्यांची असल्याचे मनिष ब्रम्हभट यांना सांगण्यात आले. रात्री प्रयत्न करुनही बैठकीत सहभागी होता येत नसल्याने त्यांनी माध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडली.
या आंदोलनास यश मिळाले. ते चांगले झाले. लोकांमध्ये सरकारविरोधात रोष आहेच. पण आंदोलनाबाबतचे निर्णय घेताना अंतर्गत लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप मनिष यांनी केला. अशा प्रकारच्या बैठकांच्या निर्णय प्रक्रियेमुळे आंदोलनातून नवे केजरीवाल तयार होतील. ते आम्हाला नको आहेत. त्यामुळे आम्ही या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलो होतो. पण अभिजीत यांनी केवळ त्यांच्या मित्रांना या बैठकीत सहभागी करुन घेतल्याचा आरोप मनिष ब्रम्हभट यांनी केला.
