एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडलेलं संकेत कुलकर्णी हत्याप्रकरण ताजं असताना औरंगाबादमध्ये तशीच आणखी एक घटना घडली. प्रेमप्रकरणातून एका बीबीएच्या विद्यार्थाने आपल्या जिवलग मित्राची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील जयसिंगपुरा भागातील रामेश्वर अपार्टमेंट येथे आज सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. हत्येनंतर आरोपीं स्वतःहून बेगमपुरा पोलीस ठाण्यात हजर झाला.

अजय शत्रूघ्न तिडके असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, मंगेश सुदाम वायवळ असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मृत अजयला गायक व्हयचे होते तो विविध गायन स्पर्धेमध्ये भागही घ्यायचा. बुधवारी रात्री विद्यापीठातील सभागृहामध्ये गायनाचा कार्यक्रम होता तेथे त्याने भीमा कोरेगाव या विषयावर गीतही गायले होते. त्याला या गाण्याबद्दाल भरभरून दादही मिळाली होती. मात्र, हाच मधुर आवाज सकाळ होताच कायमचाच बंद झाला.

मृत अजय हा शहरातील एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत तिसऱ्या वर्षात शिकत आहे. जयसिंगपुरा येथे भाडयाने राहण्यापूर्वी तो पहाडसिंगपुरा येथे भाड्याने राहत होता. त्यावेळी त्याच्यासोबत आरोपी मंगेश देखील राहायचा दोघेही जिवलग मित्र होते. त्यावेळी महाविद्यालयाच्या एका कॅम्पमध्ये अजयची एका तरुणीशी मैत्री झाली व पुढे दोघेही चांगले मित्र झाले. कॅम्पवरून परत आल्यानंतर अजयने ही बाब मंगेशला सांगत त्या तरुणीचा फोटो दाखविला. तो फोटो पाहून मंगेश देखील तिच्याकडे आकर्षित झाला. अजय जेव्हा फोनवर बोलायचा तेव्हा मंगेश त्या तरुणीशी बोलण्याचा हट्ट करायचा, असे बरेच दिवस चालले. एकदिवशी अजयने मंगेशला त्या तरुणीची भेट घालून दिली आणि तेव्हापासून मंगेश त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करायला लागला. याची जाणीव अजयला देखील झाली होती.

आरोपी मंगेश हा बीबीएचा विद्यार्थी आहे. तो राज्यसेवा परीक्षेसाठी पु्ण्याला गेला होता. ३१ मार्च रोजी तो शहरात आला व त्याच्या एका मित्राच्याकडे थांबला. बुधवारी रात्री विद्यापीठात एका कार्यक्रमात अजय आणि त्याचे मित्र गेले होते तेथून ते रात्री ११ ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रूमवर परतले, त्यावेळी रुममध्ये अजयचे रुम पार्टनर जेवण करत होते. त्यावेळी मंगेश तिथे आला व मला खासगी बोलायचे अतून तुम्ही दोघे बाहेर जा असे म्हणत दोघांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर खोलीचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्या तरुणीचा नाद सोड मला तिच्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत त्याने अजयशी वाद घातला. शेवटी अजय ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून मंगेशने अजयचा गळा आवळत त्याची हत्या केली. त्यानंतर सकाळी स्वतः पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.