छत्रपती संभाजीनगर : बीड वळण रस्ता आणि जालना रोडवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर महापालिकेने सोमवारी पैठण रस्त्याकडे मोर्चा वळवला. अकरा किलोमीटरच्या अंतरातील रस्त्याच्या दोन्हीही बाजूची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. महानुभाव आश्रमाला लागून असलेल्या माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या जागेवरील व्यावसायिक बांधकाम पाडण्यात आले. पैठण रोडवरील सुमारे चौदाशे बांधकामांवर कारवाई केली जाईल, असे अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले.
महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याला पोलीस प्रशासनाने देखील समर्थन दिले असून, या कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला. जालना रस्त्यावर मुकुंदवाडी ते चिकलठाणापर्यंत अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. सोमवारपासून पैठण रोडवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठ्या फौजफाट्यासह पालिकेचे पथक महानुभाव आश्रम चौकात दाखल झाले. या पथकात पालिकेचे सुमारे साडेतीनशे कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे चारशे कर्मचारी व वाहनांच्या ताफ्याचा समावेश होता.
महानुभाव आश्रमपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. या आश्रमाला लागूनच माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची जागा आहे. या जागेवर थाटण्यात आलेले दुकान पालिकेच्या पथकाने पाडले. पैठण रोडला लागून असलेली महानुभाव आश्रमची संरक्षक भिंत व मंदिराचा काही भाग देखील बाधित होत आहे. मार्किंगनंतर आश्रमाच्या व्यवस्थापनाने स्वत:हून बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केली. आश्रमाच्या शाळेला १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. पैठण रोडवरील काही उद्योजकांना त्यांच्या मालमत्ता काढून घेण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली.
रस्त्याच्या रुंदीबद्दल संभ्रम
पैठण रस्त्याच्या रुंदीबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे रस्त्याची तीस मीटर रुंदी गृहीत धरून (दुभाजकाच्या एका बाजूला पंधरा मिटर आणि दुसऱ्या बाजूला पंधरा मीटर) रस्त्याचे काम केले आहे. महापालिका मात्र साठ मीटर रुंदीचा रस्ता गृहीत धरून बांधकामे पाडण्याची कारवाई करीत आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी नेमकी किती असा नागरिकांचा प्रश्न आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मालकी दुभाजकाच्या एका बाजूने पंधरा मीटरची आहे. त्यानंतरची पंधरा मीटरची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आहे. या जागेवर कारवाई केली जात आहे. पालिकेने ज्या मालमत्ताधारकांना बांधकाम परवानगी दिली आहे, अशा मालमत्ताधारकांची संख्या फारच कमी आहे, अशी बांधकामे अनधिकृत बांधकामे म्हणून समजली जातात. या बांधकामांवर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार महापालिकेला आहे. ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे व त्यांचे बांधकाम साठ मीटर रुंदीत बाधित होत आहे अशांना पालिका टीडीआरच्या स्वरुपात मोबदला देणार आहे. संबंधितांनी प्रस्ताव सादर केल्यावर पालिका सात दिवसांत त्यांना टीडीआर देण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
वाल्मीचे गेट, कृषी केंद्राची भींत बाधित
अतिक्रमण हटावच्या कारवाईत वाल्मी या शासकीय संस्थेचे गेट (प्रवेशद्वार) बाधित होत आहे. महापालिकेने वाल्मीच्या परिसरात मार्किंग करून बाधित होणारा भाग वाल्मी प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. महानुभाव आश्रमाच्या जवळ असलेल्या कृषी विज्ञान केंद्राची संरक्षक भींत देखील या कारवाईत पाडण्यात येणार आहे. त्याशिवाय काही राजकीय पदाधिकारी, नेत्यांची बांधकामे सोमवारी पाडण्यात आली.