छत्रपती संभाजीनगर : विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे सादरीकरणातून सरकारवर प्रहार करण्याचे प्रारुप आता राज्यात आदित्य ठाकरे यांनीही स्वीकारले असून मराठवाडा मुक्ती दिनीनिमित्ताने २०२३ मध्ये घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील आश्वासनांची चिरफाड करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ डेव्हलपमेंट डिलेड, डेव्हलपमेंट डिनाईड ’ असे या शीर्षक या कार्यक्रमास देण्यात आले आहे. ३ सप्टेंबर रोजी एमजीएमच्या रुक्मीणी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१७ सप्टेंबर रोजी दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यात येतात. हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील सैनिकांना तेव्हा आदरांजली वाहिली जाते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात यावी, अशी मागणी होते. अलिकडच्या काळात अशा दोन मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्रव्यवहार केला होता. या पत्र व्यवहारानंतर विभागीय आयुक्तांनी केलेल्या घोषणांवर काय कार्यवाही झाली याचा आढावा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे याच्या उपस्थितीमध्ये घोषणांचा आढावा घेण्यात आला. यातील अनेक सिंचन प्रकल्पाचे कागदी कामकाजही पूर्ण झाले नसल्याचे दिसून आले होते.
घोषणा किती कोटीच्या ?
१६ सप्टेंबर २०२३ मध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या मंत्रिमंंडळ बैठकीत ४४ हजार ५७९ कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक तरतूद जलंसपदा विभागास देण्यात आली होती. २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपयांची कामे प्रस्तावित होती. सार्वजनिक बांधकाम विभगाास १२ हजार ९३८ कोटी रुपये मंजूर होते. तेव्हा मराठवाड्यातील निजामकालीन शाळांच्या दुरुस्तीसाठी लोकसहभागाची अट वगळून २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यातील अनेक कामे झालीच नाहीत. काही कामांचे कागदीघोडे नाचविणे सुरू आहे. अनेक योजना पूर्णत्वास येत नसल्याने मराठवाड्याच्या विकासाची संथ गती कायम आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने बोट ठेवत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
जलसंपदा, शिक्षण, आरोग्य आणि पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना मंजूर होऊनही कामच होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मंत्रिमंडळ निर्णयाची चिकित्सा शिवसेनेकडून केली जाणार आहे. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी शिवसेनेच्या मराठवाड्यातील तीन आमदारांनी जिल्ह्यांचा दौरा केला. तसेच विविध पपातळ्यावरुन माहिती एकत्र केली आहे. त्याचे सादरीकरण आदित्य ठाकरे ३ सप्टेंबर रोजी करणार आहेत.
