कारवाई जास्त पण तपासणी कमी असल्याने अडचणी

सुहास सरदेशमुख लोकसत्ता

औरंगाबाद : मिठाई, दूध, खवा यासह अन्न पदार्थात होणाऱ्या भेसळीचे नमुने तपासणीसाठी राज्यात केवळ तीन राष्ट्रीय अधिस्वीकृती प्रयोगशाळा असल्याने कारवाईतून जमा केलेले हजारो नमुने सहा महिन्यांहून अधिक काळापर्यंतही तपासले जात नाहीत. औरंगाबाद  विभागातील ३ हजार ५०० नमुने अजून तपासणे बाकी आहेत. या समस्येमुळे केलेली कारवाई न्यायालयात वैध ठरविताना खूप साऱ्या अडचणींना तोंड द्यावे लागते, अशी कबुली अन्न व औषधेमंत्री राजेंद्र  शिंगणे यांनी दिली. दीपावलीपूर्वी अन्न व औषधी  विभागाकडून खवा आणि मिठाईतील भेसळ तपासणीसाठी कारवाई सुरू आहे. भेसळ होत असेल तर कारवाई संख्या वाढवा, असे आदेश मंत्र्यांनी नव्याने दिले आहेत. दूध भेसळ आणि मिठाईवर केवळ सणावारापूर्वीच कारवाई होते. एरवी ती कमी का असते, या विषयी  मंत्री  शिंगणे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहोत. पण प्रयोगशाळा कमी आहेत. तसेच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे पदे भरण्यासंबंधीची माहिती कळविण्यात आली आहे. पण राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाकडून मान्य केलेल्या चाचणी प्रयोगशाळा कमी आहेत. सध्या मुंबई, पुणे, नागपूर येथे प्रयोगशाळा सुरू आहे. नाशिक आणि आमरावतीमध्ये प्रयोगशाळा प्रस्तावित आहेत.’ औरंगाबाद येथील प्रयोगशाळेस अद्याप मान्यता मिळणे बाकी आहे. त्रुटी दूर करून पुन्हा मान्यता मिळावी, यासाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंत्री  शिंगणे यांना शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिली. राज्यात प्रतिबंधित पदार्थ विक्रीवरील कारवायाही वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याचे उद्दिष्टय़ेही ठरवून देण्यात आले आहेत. येत्या काळात प्राणवायूची कमतरता भासू नये म्हणून १८५० मेटनापर्यंत क्षमता वाढविण्यात आल्या आहेत. सध्या प्राणवायू प्रकल्पाची गरज फारशी नसल्याने विजेवर चालणारे काही प्रकल्प बंद आहेत. पण प्राणवायू प्रकल्पाची क्षमता आता वाढली असल्याचे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.