scorecardresearch

नऊ महिन्यांनंतर जनधन खात्यातील ९० कोटीं पुन्हा खात्यात जमा; वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे उत्तर

जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत ही रक्कम बँकेने वापरल्याचे मान्य करण्यात आले आहे.

वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे उत्तर

औरंगाबाद: महिनाभरात बँक खात्यातून चारपेक्षा अधिकवेळा काढले गेलेले पैसे व डिजिटल अदाईसाठी लागणाऱ्या पाचपेक्षा अधिक अदाईतून ९० कोटी १९ लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वसूल करण्यात आले होते. १ जानेवारी २०२० ते १४ सप्टेंबपर्यंत २०२० पर्यंत करण्यात आलेली ही वसुली परत करण्याच्या सूचना रिझव्‍‌र्ह बँकेकडून करण्यात आल्यानंतर ती रक्कम पुन्हा त्या खात्याकडे वर्ग करण्यात आली असल्याचे उत्तर केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिले आहे. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत ही रक्कम बँकेने वापरल्याचे मान्य करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जनधन खाते वाढवा, असा आग्रह डॉ. कराड यांच्याकडून केला जात होता. वित्तीय समावेशकता वाढावी यासाठी औरंगाबादसह देशातील विविध भागात त्यांनी खास कार्यशाळा, बैठकाही घेतल्या होत्या. प्रत्येक खात्यातून महिनाभरात चार वेळा रक्कम काढण्याच्या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क लागत नाही, पण त्यानंतर रक्कम लागते. गरिबांसाठी कोणत्याही अनामत रकमेशिवाय जनधन खाते उघडण्याची योजना ऑगस्ट २०१४ मध्ये सुरू करण्यात आली. जनधनखाते काढण्याची ही प्रक्रिया नव्याने सज्ञान झालेल्या गरिबांसाठी सुरूच ठेवावी अशा सूचना बँकांच्या बैठकीमध्ये डॉ. कराड यांनी या पूर्वी दिल्या होत्या. जनधन खात्यातील डिजिटल वसुलीचा प्रश्न वित्त विभागालाही विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात स्टेट बँक ऑफ इंडियाने अशी रक्कम वसूल केल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातून ९.४० कोटी रुपये अतिरिक्त म्हणजे चारपेक्षा अधिकच्या डिजिटल व्यवहारातून वसूल करण्यात आले होते. ही रक्कम आता परत करण्यात आली असल्याचा बँकेचा दावा आहे. या बँकेकडून होणाऱ्या वसुलीबाबत डॉ. कराड यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले,‘ जनधन खात्यातून कोणत्याही प्रकारचे शुल्क लावता येणार नाही. कमी रक्कम असल्यामुळे व डिजिटल व्यवहार केल्याने काही रक्कम काढून घेण्यात आली असली तरी ती परत करण्यात आली आहे. ज्या बँकांनी अशा प्रकारची कारवाई केलेली असेल त्यांनाही पुन्हा जनधन खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले जाईल.अन्य बँकात असे काही झाले असल्यास त्यात लक्ष घालू, असे डॉ. कराड म्हणाले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After nine months rs 90 crore jandhan account credited back to the account akp

ताज्या बातम्या