किराडपुरातील अनेक घरांना टाळे, आठ जणांना अटक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : राम नवमीच्या पूर्वसंध्येला घोषणाबाजीमुळे व सायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून शहरातील किराडपुरा भागात झालेल्या हिंसाचारानंतर शहरातील सर्व भागांतील जनजीवन शुक्रवारी सुरळीत झाले. सायंकाळपर्यंत पोलिसांनी आठ जणांना अटक केली.

दंगलीमध्ये पोलिसांची गोळी लागून मृत झालेले ४५ वर्षांचे शेख मुनिरोद्दीन यांच्यावर पहाटे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असल्याने यामध्ये पोलीस पकडून नेतील या भीतीने किराडपुरा व भोवतालचे अनेक जण आपल्या घरांना टाळे लावून इतरत्र गेल्याचे दिसून आले. परिस्थिती नियंत्रणात असली, तरी राम मंदिर परिसर, तसेच किराडपुरा भागात शीघ्र कृती दल व राज्य राखीव पोलीस दल व दंगा नियंत्रक वाहने तैनात आहेत.

 दरम्यान, या हिंसाचारादरम्यान पोलीस कुमक वेळेवर न पोहोचल्याच्या आरोपापासून ते दंगल घडावी असे वातावरण निर्माण करण्यास दोन्ही गटांचे नेतेच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.  दंगलीनंतरच्या स्थितीची पाहणी पुणे पोलीस उपमहानिरीक्षक संजयसिंह ऐनपुरे यांनी पाहणी केली. हिंसाचार झालेल्या राम मंदिरासमोरील फैज कॉम्प्लेक्समधील रहिवासी शेख मुनिरोद्दीन यांच्या पोटात गोळी लागल्यानंतर त्यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निगराणीखाली त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 हिंसाचार व जाळपोळ प्रकरणात पोलीस गुन्ह्यामध्ये सहा जणांच्या नावात मृत मुनिरोद्दीन यांच्या नावाचाही समावेश करण्यात आलेला आहे. वास्तविक मृत फैज कॉम्प्लेक्सच्या लोखंडी गेटच्या आतमध्ये उभे होते. तरी त्यांचे नाव आरोपीच्या यादीत कसे, असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करीत आहेत. दंगेखोरांमध्ये किराडपुरा भागातील तरुणांचा समावेश नव्हता. पोलीस जेव्हा दंगेखोरांना रोखत होते तेव्हा ते कोणत्याही छोटय़ा गल्ल्यांमध्ये पळत नव्हते. त्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तींचेच हे काम असावे, असे स्थानिक सांगत आहेत. मंदिरासमोर फैज कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या मृत मुनिरोद्दीन यांच्या घराला टाळे होते. या कॉम्प्लेक्समधील बहुतांश रहिवासी घराला कुलूप लावून अन्यत्र निघून गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी गुरुवारी नोंदविलेल्या गुन्ह्यामध्ये शौकत चांद शहा, अरबा, रिजवान शेख पाशू, शेख मुनिरोद्दीन शेख मोइनोद्दीन, अल्ताफ, फिरोज मौलना, हाशमी इत्तरवाले यांचा मुलगा यांची नावे नोंदविण्यात आली आहेत.

 मंदिराचे अध्यक्ष तथा उद्योजक मानसिंग पवार यांना या घटनेविषयीचे विचारले असता ते म्हणाले, की एवढे दिवस मंदिर परिसरात कधीच गोंधळ झाला नाही. अगदी बाबरी मशीद पडली होती आणि रामजन्मभूमीचा निकाल लागला होता तेव्हाही नाही. तेव्हा तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनेक मुस्लिम बांधवांनी मंदिराजवळील वृत्तवाहिन्यांवर ऐकला. मंदिर संस्थानच्या गाळय़ांमध्येही अनेक मुस्लिमांना जागा दिली आहे. त्याच्या भाडय़ावरूनदेखील कधी वाद झाला नाही. सामाजिक वीण नीट बसविण्यासाठी दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. दंगलीनंतर राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

अटकेतील आरोपींची नावे

बरकत शौकत शेख, शेख अतिक शेख हारूण, सद्दामशहा बिस्मिल्ला शहा, शेख खाजा शेख रशीद, शारेख खान इरफान खान, शेख सलीम शेख अजीज, सय्यद नूर सय्यद युसूफ व शेख नाजीम शेख अहेमद, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the violence search police accused normal life in chhatrapati sambhajinagar ysh
First published on: 01-04-2023 at 00:02 IST