सहकार खात्यात कनिष्ठ कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून नियमित कामकाजाशिवाय निवडणुकांसारखी कामे सोपवली जातात. याचा परिणाम सहकारी संस्थांच्या गुणात्मक, संख्यात्मक वाढीवर झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नराश्य असून, वेगवेगळय़ा शारीरिक-मानसिक व्याधींनी घेरले आहे. या त्रासातून सुटका करावी म्हणून बुधवारपासून काळय़ा फिती लावून कामकाज सुरू करण्यात आले. शुक्रवारपासून (दि. १ एप्रिल) बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात कर्मचारी आहेत.
सहकारी संस्थांची गुणात्मक, संख्यात्मक वाढ होऊन जनतेला त्याचा फायदा व्हावा, या उद्देशाने खात्याची निर्मिती करण्यात आली. परंतु सरकारची, जनतेची दिशाभूल करून गेल्या अनेक वर्षांपासून खात्याच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात गुंतवून ठेवले जाते. याचा सहकारी संस्थांच्या गुणात्मक, संख्यात्मक वाढीवर परिणाम होऊन सर्वसामान्य जनतेच्या ठेवी बुडणे, बेकायदा सावकारी, विकसकाकडून फसवले जाणे आदी असे प्रकार घडत आहेत. एकाच वेळी नियमित कामकाजाशिवाय सर्वेक्षण, अवसायन, प्रशासक, ८९ अ तपासण्या, निवडणुका आदी कामे वर्ग ३ कर्मचारी करीत असताना कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या, कामांची संख्या व जबाबदारी यांचा बिलकुल विचार न करता सर्व कामे एकाच वेळी उरकण्याचा आग्रह धरून, कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडे असलेल्या कामांच्या संख्येचा विचार न करता सर्व कामे एकाच वेळी पूर्ण करण्याच्या घाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नराश्य आल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.