देशाने कधीही, कोणाचीही हुकूमशाही खपवून घेतली नाही. कोणी ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही, पण अडवणूक करून पाठीमागच्या दाराने सरकार आणीबाणी आणू पाहत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील आणीबाणी आणली होती. त्यालाही विरोध झाला. पण नंतर जनतेने त्यांना निवडून दिले. येथे आवाज दाबता येत नाही आणि दाबलात तरी बटन दाबताना आता लोक ऐकणार नाहीत, अशी शेलक्या शब्दात टीका करत अजित पवार यांनी राज्य सरकारला सवाल केला, मराठवाडय़ात कोणती धरणे बांधली, किती बॅरेजेस केले आणि साठवण तलाव तरी केला का? हल्लाबोल आंदोलनात अजित पवार यांच्या भाषणात राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका होती.

सभास्थळी इंटरनेट जामर बसवण्याच्या मुद्दय़ावरून पवार यांनी देशात हुकूमशाही खपवून घेतली जात नाही, असे सांगत अजित पवार यांनी एमपीएससी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. तरुणांच्या मनात सरकारविषयीची खदखद आहे. एमपीएससीच्या जागा दरवर्षी भरल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. गरीब आणि दलित समाजाला शिकण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव सरकार आखत आहे. त्यामुळे त्यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय सचिवांनी जाहीर केला आहे. एक हजार पट नसणाऱ्या शाळा बंद केल्या जातील, असे सांगितले जात आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेला नव्याने सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे हरताळ फासला जाईल, असे ते म्हणाले.

हल्लाबोल आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचेही भाषण झाले. ते म्हणाले, विधान परिषदेत ११ मंत्र्यांच्या विरोधात पुरावे दिले. मात्र, दरवेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीनचिट दिली. चिट देता देता मुख्यमंत्र्यांनी स्वत: चिटमिनिस्टर होऊ नये, असे त्यांना सांगणे असल्याचे म्हणत मराठवाडय़ाच्या हक्काचा विकास व्हायला हवा, अशी भूमिका मांडली. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा सरकार धसका घेत असल्याचे सांगत सभेला परवानगी नाकारण्याचा प्रकार त्याचाच भाग असल्याचे ते म्हणाले. फसणवीस सरकार असा उल्लेखही त्यांनी केला. निकषासह तत्त्वत: कर्जमाफी असे सांगत ती रक्कम मिळाली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला आणि राज्य सरकारने केलेल्या घोषणा फसव्या असल्याचे सांगितले. निवडणुकीपूर्वी जेव्हा जाहिराती आणि आश्वासने दिली जातील तेव्हा एक लक्षात ठेवा, ‘इस धारावाहिक के सभी पात्र काल्पनिक है’. मराठवाडय़ाच्या विकासासाठी घेतलेल्या ३७ निर्णयांपैकी एकाही निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही, असेही ते म्हणाले.

गाजर म्हणते, माझे नाव खराब केले!

केंद्र आणि राज्य सरकारने एवढी आश्वासने दिली की गाजर म्हणते, भाजप-सेनेने आमचे नाव खराब केले. तुमची मुदत २०१९पर्यंतचीच आहेत. मग २०२२ची आश्वासने का देता? कशाला गप्पा मारता, असा सवाल करत अजित पवार म्हणाले, गाजरसुद्धा आता म्हणत असेल, माझे नाव या सरकारने खराब केले.

शिवसेनेचे कासव

शिवसेनेवर टीका करताना अजित पवार म्हणाले, आता त्यांचा वाघ पळून गेला आहे. त्याची शेळी झाली आहे. त्याच्यानंतर त्याचा ससाही झाला. आणि तर आता त्यांचा कासव झाला आहे. त्यांना जरा हात लावायला उशीर, ते सगळेच अवयव आत घेऊन बसतात. एवढे दिवस औरंगाबादमध्ये सत्ता होती, तेव्हा काय विकास केला? त्यासाठी दानत आणि हिंमत लागते.

क्षणचित्रे

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या हल्लाबोल आंदोलनात मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आत्महत्येसाठी गळाला फास लावलेले शेतकऱ्यांचा जिवंत देखावा, तसेच सरकार म्हणून उभा केलेला यम ही मोर्चाचे आकर्षण ठरले. त्याचबरोबर खास तुळजापूरहून संबळ घेऊन गोंधळीही आले होते. त्यांनाही पाहण्यासाठी गर्दी होती. आमदार सतीश चव्हाण यांची छबी असलेले टीशर्ट घालून अनेक कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.