छत्रपती संभाजीनगर : दोन विचार परंपरांच्या मध्यभागी राहून सत्ताकारण साधणार्या अजित पवार यांचे जाणे जिव्हारी लागणारे आहेच; पण अजित पवार नामक संस्थात्मक आधाराच्या टेकूवर सत्तेच्या पुलावर स्वार झालेल्यांपैकी अनेकांना ‘आता आपले स्थान काय’ ही नवी चिंता सतावत आहे.
विशेषत: उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी ज्यांना बळ दिले त्यांनी आता नक्की काय करायचे याविषयी कमालीचे संभ्रम आहेत. यात मराठवाड्यातील दहा आमदार आणि सहकारमंत्री यांच्यासमोरही यक्ष प्रश्न असतील, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.
केवळ आमदार आणि मंत्री नाही तर मराठवाड्यातून नव्याने निवडून आलेल्या ३०१ नगरसेवक आणि ११ नगराध्यक्षांसह केवळ अजितदादा हेच नेते असे मानणार्यांना त्यांच्या संस्थात्मक राजकारणाला सत्तेतील कोणत्या कोणत्या व्यक्तींकडून ‘बळ’ मिळेल याविषयी कमालीची साशंकता आहे. अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मोठे राजकीय प्रश्नचिन्ह घेऊन अनेक कार्यकर्ते गुरुवारी गावी परतले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणास संस्थात्मक मोठा आधार. अजित पवार यांनी साखर कारखान्यांना मोठे बळ दिले. या वेळी माजी मंत्री संजय बनसोडे यांच्याऐवजी सहकारमंत्री म्हणून बाबासाहेब पाटील यांना सहकारमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिले. आता जेवढे बळ अजित पवार यांच्याकडून मिळत असे तसे बळ सत्तेतील भाजपकडून मिळेल का, याविषयी बाबासाहेब पाटील यांच्या समर्थकांनाही शंका वाटते. संजय बनसोडे यांना आता राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्याचा आधार याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.
मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार. परभणीमध्ये राजेश विटेकर, लातूरमध्ये बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर, हिंगोलीमध्ये राजू नवघरे, बीडमध्ये धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित हे विधानसभेत तर सतीश चव्हाण आणि विक्रम काळे हे अनुक्रमे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून सलग निवडून आलेले आमदार. या प्रत्येकाच्या राजकारणाचा पिंड संस्थात्मक राजकारणाचा. याशिवाय साखर कारखानदारीत असणारे माजी आमदार राहुल मोटे, सुरेश बिराजदार ही मंडळी वेगळीच.
याशिवाय सत्तेत वाटा मिळत असल्याने नव्याने राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले माजी आमदार सुरेश जेथलिया, शिवाजी चोथे, भीमराव धोंडे, ही मंडळी राष्ट्रवादीमध्ये नव्याने आलेली. या प्रत्येकाचा थेट अजित पवार यांच्याशीच संपर्क. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर आता आपला नेता कोण, असा प्रश्न या सार्यांपुढे निर्माण झाला आहे. यापैकी धनंजय मुंडे , प्रताप पाटील चिखलीकर यांचे भाजपशी संबंध चांगले असल्याने त्यांच्या चिंतेची धार काहीशी कमी. पण कार्यकर्त्यांसमोर ‘नेता कोण’ हा प्रश्न आहेच.
साखर कारखान्याच्या क्षेत्रातील थेट राजकीय पटावर न येता काम करणार्या अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांसमोर वेगळेच प्रश्न निर्माण झाले आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये हव्या असणार्या नियुक्त्या, वर्ग खोल्यांच्या मान्यतेपासून ते बांधकाम परवानग्यांपर्यंत काम कोणाला सांगायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धोरण ठरवणार नेते शरद पवार आणि त्यांची सत्तेत अंमलबजावणी करणारे नेते अजित पवार हे सूत्र अगदी ग्रामीण भागात पोहोचले होते. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दलित, मुस्लीम मते सत्तेच्या बाजूने वळविण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला यश मिळाले होते.
मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या मराठवाड्यात अजित पवार यांनी मोठा विस्तार केला होता. नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे ३५५ नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३०१ नगरसेवक निवडून आले होते. म्हणजे भाजपपेक्षा केवळ फक्त ५४ नगरसेवक कमी अशी राजकीय स्थिती होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फटका बसण्याच्या शक्यतेने भाजपने मराठवाड्यात अजित पवार यांना वाढीस मोठी संधी दिली होती. त्यामुळे अजित पवार यांनी जळजळीत टीका करूनही भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले होते, अशी आठवण आवर्जून करून दिली जाते.
अशा राजकीय पटावर विचारांच्या पातळीवर मध्यभागी उभारून सत्तेच्या गणितात अजित पवार भाजपला मदत करत होते. ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांसाठी भाजपच्या कोणत्या नेत्याला भेटायचे असा प्रश्न अजूनही कायम आहे.

