अकोले: कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे यावेळची कर्जमाफी आजपर्यंतच्या सर्व कर्जमाफीमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली व खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी किसान सभेने आज, बुधवारी येथे कर्जमाफी आदेशाची होळी करण्याचे आंदोलन केले.
कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या अटी रद्द करा तसेच सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी किसान सभेची मागणी आहे. सरकारने कर्जमाफी करताना, २०१९ मध्ये कर्जमाफी घेतलेले शेतकरी, जरी ते यावेळी थकित असले तरी त्यांना केवळ ५० हजार रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ ५० हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यांनाही किमान दोन वर्ष नियमित कर्जदार असणे ही अट टाकण्यात आली आहे. अत्यल्प पगारावर राबणाऱ्या सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन द्यायचे आणि आता २ लाख कर्ज माफ करणार सांगून बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ ५० हजारावर बोळवणूक करायची ही अत्यंत संतापजनक गोष्ट असून ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक असल्याची टीका डॉ. अजित नवले यांनी यावेळी बोलताना केली.
शेतकऱ्यांच्या या फसवणुकी विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून तो राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होत असल्याचा दावा त्यांनी केला. अकोले शहरातील महत्मा फुले चौकात फसव्या कर्जमाफी अध्यादेशाचे दहन करून आंदोलन करण्यात आले.कर्जमाफीसाठी लावलेल्या अटी रद्द करा. सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. नियमित कर्जदार शेतकरी, शेड नेट, पॉली हाऊस शेतकरी, कुक्कुट पालन शेतकरी यांच्यासह सर्व पीक व शेती सुधारणा कर्ज माफ करा आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड सदशिव साबळे, गणेश ताजणे, लक्ष्मण घोडे, बाळासाहेब मधे, संगिता साळवे, हेमलता शेळके, दत्ता कोंडार, दिलिप हिंदोळे, आप्पा घोडे, वामन मधे यांनी केले.
