मराठवाडय़ात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याने शिवसेनेचे सर्व मंत्री मराठवाडा मुक्कामी दाखल होणार आहेत. दरम्यान, ११ व १२ सप्टेंबरदरम्यान उद्धव ठाकरे मराठवाडय़ाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ग्रामीण भागात अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींचे सामुदायिक विवाह, स्वस्त धान्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरकार म्हणून तर पाहूच पण शिवसेनाही मदतकार्यात उतरेल, अशी माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली.
नुकतेच मुंबईत ठाकरे यांनी मंत्र्यांची बठक घेऊन दुष्काळग्रस्तांना काय मदत करता येईल, याचा आढावा घेतला. पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यात अपेक्षित मदत काय असावी, याचा आढावा पालकमंत्री कदम यांनी घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात संवेदनशील वाटणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अतिगरीब शेतकरी कुटुंबांचे हे सर्वेक्षण उद्या (शुक्रवारी) हाती येणार असून त्यांना कोणत्या योजनांद्वारे मदत करता येईल, याची पाहणी करण्यासाठी कदम यांनी त्यांच्या ६ स्वीय सहायकांना  प्रत्येक तालुक्यात पाठविले होते. योजना पोहोचविताना अन्यही मदत करायची झाल्यास ती कशी करता येईल, याचा विचार पक्ष म्हणून केला जाणार आहे. अतिबाधित शेतकरी कुटुंबांना शाखाप्रमुख भेटी देतील. त्यांच्यासह पुन्हा मुंबईत बठक होणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्याचे नियोजन केले जाईल,असे कदम म्हणाले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना दिलासा देता यावा, या साठी सेनेकडून स्वतंत्र योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.