छत्रपती संभाजीनगर : राज्यातील उपेक्षित असलेल्या सर्व तांड्यांना आता स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयामुळे तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचे अस्तित्व प्राप्त होऊन विकासाचा १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. .

धाराशिव जिल्ह्यातील ईट, येणेगूर, आपसिंगा आणि ढोकी येथील प्रचारसभांमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील आणि महायुतीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मुख्य गावांपासून लांब असलेले तांडे अनेकदा सोयी-सुविधांपासून वंचित राहतात. आता स्वतंत्र गावचा दर्जा मिळाल्याने तांड्यांच्या विकासाचा स्वतंत्र आराखडा तयार करता येईल. यामुळे सामाजिक न्याय आणि आत्मसन्मान तर वाढेलच, पण रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन स्थलांतरही कमी होईल.

केंद्र आणि राज्य सरकारच्या १२४ योजनांचा उल्लेख करत बावनकुळे यांनी सांगितले की, ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याची संधी आहे. सौर ऊर्जेद्वारे १२ तास वीज पुरवठा, ‘बळीराजा पाणंद रस्ते’ योजना आणि कर्जमाफीचा लाभ आपल्या सरकारमुळे उपलब्ध होत आहे. लाडकी बहीण योजना निरंतर सुरू राहणार असून महिला बचत गटांना ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाईल. बचत गटांच्या उत्पादनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्यामुळे या सगळ्या लोककल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे गावखेड्यात प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीलाच बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.