मराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई

(संग्रहित छायाचित्र)

विधानसभा निवडणूक-२०१९

राज्याच्या राजकारणात काँग्रेसला बळ देत ज्या मराठवाडय़ाने चार मुख्यमंत्री दिले, त्या मराठवाडय़ात २०१४ च्या निवडणुकीत केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले होते. येत्या निवडणुकीत ही संख्या गाठण्यासाठी काँग्रेसला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. अशीच अवस्था राष्ट्रवादीची आहे. महत्त्वाची पदे सांभाळणारी राष्ट्रवादीतील दिग्गज नेते आता भाजपात दाखल झाले आहेत. आधीच मराठवाडय़ावर वर्चस्व असणाऱ्या भाजपाला या वेळी मतदार साथ देतात की नाही, हे पाहणे अधिक औत्सुक्याचे असणार आहे. मराठवाडय़ात भाजपच्या १५ जागा आहेत, तर शिवसेनेचे ११ आमदार आहेत.

जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप आणि सेनेला मतदारांनी स्वीकारले असल्याचे निकाल गेल्या पाच वर्षांत लागले. यात सेनेची बरीच फरपटही झाली. त्यांना किती जागा मिळतील आणि नव्याने भाजपात आलेल्या नेत्यांसाठी सेना जागा सोडणार की नाही यावर वर्चस्वाचे गणित अवलंबून असेल, असे मानले जाते. शिवसेनेतून कन्नड मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन जाधव लोकसभा निवडणुकीतून बाहेर पडले. प्रताप पाटील चिखलीकरांनी सेनेत असतानाच भाजपशी जवळीक साधली होती. ते नंतर लोकसभा निवडणुकीत भाजपात गेले. नांदेडचे खासदारही झाले. आता लोहा मतदार संघ सेनेला सुटतो, की भाजपचा उमेदवार तेथून द्यायचा, असा तिढा युतीच्या नेत्यांसमोर असणार आहे. असाच तिढा उस्मानाबाद मतदार संघातही आहे. राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या राणाजगजितसिंह पाटील यांचा हा मतदार संघ आहे. युतीमध्ये सेनेच्या ताब्यात असणारा हा मतदार संघ सोडला जाणार का, या प्रश्नाचे उत्तर युतीतील नेते कसे काढतात, यावर निवडणुकांमधील रणनीती ठरली जाऊ शकते. बीड मतदार संघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले जयदत्त क्षीरसागरही शिवसेनेत दाखल झाले आहेत. बीड जिल्ह्य़ातील राजकारणात मित्रपक्षातील नवा राजकीय खेळाडू मुख्यमंत्र्यांमुळे उतरल्यामुळे या मतदार संघाचे राजकारणही बदलले जाऊ शकते.

गेल्या पाच वर्षांत बीड, लातूर या जिल्ह्य़ांमध्ये भाजपने राजकारणात नवा प्रभाव निर्माण केला. बीड जिल्ह्य़ातील आष्टी, केज, परळी, गेवराई, माजलगाव या पाच मतदार संघांत भाजपचे आमदार होते. राष्ट्रवादीचे केवळ जयदत्त क्षीरसागर निवडून आले होते. आता तेही त्या पक्षात नाही. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या राजकारणातील कमळाचे वर्चस्व पुसून काढण्यासाठी राष्ट्रवादीने ताकद वाढवली असली, तरी त्याला यश मिळेल का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

लातूर आणि नांदेड जिल्ह्य़ात काँग्रेसचे मोठे नेते असल्यामुळे तेथे या पक्षाचा प्रभाव राहील, असे मानले जात होते. मात्र, गेल्या पाच वर्षांतील राजकीय बदलांमुळे या नेत्यांना संघर्ष करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. त्यामुळे जिल्ह्य़ातील काँग्रेसचे संघटन पुन्हा बांधून विधानसभा निवडणुकीत यश मिळविणे, हे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

वंचित बहुजनमुळे गणिते बदलणार

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कशापद्धतीने मतदान घेतात, यावर मतदार संघाची गणिते अवलंबून असणार आहे. गेल्या काही दिवसांत प्रकाश आंबेडकर यांचे औरंगाबादसह मराठवाडय़ातील दौरे वाढले आहेत. मात्र, एमआयएमबरोबरच वंचित बहुजनची आघाडी कायम राहते की तुटते यावरही मतदार संघाचे गणित बदलेल, असे सांगण्यात येते.

मराठवाडय़ातील पक्षीय संख्याबळ

भाजप-                   १५

शिवसेना-               ११

राष्ट्रवादी-                 ८

काँग्रेस-                   ९

अपक्ष-                    २

एमआयएम-          १

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Alliance will dominate marathwada abn

Next Story
बेगमपुऱ्यातील दस्तनोंदणी; महसूल यंत्रणाही सरसावली!
ताज्या बातम्या